काँग्रेस कात टाकणार !काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात

नवी दिल्ली : अध्यक्ष बनल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील ५० टक्के पदं ही ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली. उदयपुर येथील अधिवेशनात पक्षाची ५० टक्के पदं ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना देण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करणार असल्याचे खरगे यांनी यावेळी म्हटले.

काँग्रेस पक्षात नव्या युगाची सुरुवात झाली असून काँग्रेसला २४ वर्षांनंतर बिगर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलताना खरगे यांनी मोदी सरकावर टीका केली. तसेच, भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, पण त्यांनाही माहिती आहे, ते शक्य नाही. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही, असे म्हणत नवनियुक्त अध्यक्षांनी मोदी सरकारला आव्हानच दिले.