राज्यातील २९ हजार कोटींच्या घोटाळ्यांचा लवकरच सीबीआय तपास

राज्यातील १६८ प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू होणार

मुंबई ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे तपास करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण मंजुरी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने पुन:प्रस्थापित केल्यामुळे आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्यातील १६८ प्रकरणांत चौकशी सुरू करता येणार आहे. या प्रकरणांत तब्बल २९ हजार ४० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये एकेकाळी भरभराटीला असलेल्या बुडीत विमान कंपनीच्या मालकाच्या प्रकरणाचा समावेश आहे.

सदर बुडीत विमान कंपनीच्या मालकाविरुद्ध एका ट्रॅव्हल कंपनीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित विमान कंपनी मालकाचा संबंध नसल्याचा अहवाल दिला. याच गुन्ह्यावरून काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तपास करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाला आक्षेप घेत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे अपील फेटाळले. मात्र विद्यमान सरकारने आता सीबीआयला आवश्यक असलेली सर्वसाधारण मंजुरी सरसकट देऊन टाकल्यामुळे या विमान कंपनी मालकाच्या प्रकरणात सीबीआयच्या आर्थिक गुन्हे विभागाला चौकशी करता येणार आहे. सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयालाही पुन्हा चौकशी करता येणार आहे.