दीपावली पाडवा दिनी बळीराजाला जगविण्याचा वैजापुरात संकल्प

वैजापूर,२६ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कृषी संस्कृती टिकली तरच देशाची संस्कृती टिकेल,  शेतकरी जगला तरच देश जगेल अशा घोषणा देत व बळीराजाचा विजय असो असे म्हणत वैजापूर येथील बळीराजा गौरव समितीच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील खंबाळा येथील अल्पभूधारक शेतकरी लालू बनकर व सौ.वत्सला बनकर यांचा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात चोळी लुगडे, टोपी, उपरणे देऊन दीपावली पाडवा दिनी बुधवारी (ता.26) गौरव करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते रवींद्रआप्पा साखरे, आयोजक आबासाहेब जेजुरकर, दिलीप अनर्थे, सुमनबाई गायकवाड यांनी या शेतकरी पती-पत्नीचा यथोचित गौरव केला. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी आजच्या शेतकऱ्यांवर झालेला निसर्ग कोप अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी व शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात अशी मागणी केली.  

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन करण्यात आले. नंतर नांगरधारी  बळीराजाच्या प्रतिमेला ही अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेचे शिक्षण सभापती दशरथ बनकर, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, अण्णा ठेंगडे, तालुकसैनिक संघटनेचे गौतम गायकवाड, शेतकरी गोरसे, प्रमोद पठारे व शेतकरी वर्ग उपस्थित होता.