4G स्मार्टफोनवर 5G इंटरनेट मिळणार; जिओ ट्रू 5G नेटवर्कवर चालणारी वायफाय सेवा सुरू

मुंबई ,२५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.ने जिओ ट्रू 5G नेटवर्कवर चालणारी वायफाय सेवा सुरू केली आहे. जिओ ट्रू 5G समर्थित वाय-फाय राजस्थानमधील नाथद्वारापासून सुरू करण्यात आले आहे. या सुविधेसह, तुम्ही 5G स्मार्टफोनशिवाय वाय-फायशी कनेक्ट करून 4G स्मार्टफोनवरही 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकाल. याआधी २०१५ मध्ये मुकेश अंबानी यांनी नाथद्वारातूनच जिओ कंपनीची 4G सेवा सुरू केली होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीनंतर आता नाथद्वारा आणि चेन्नई जिओ ट्रू 5G नेटवर्कशी जोडले गेले आहेत.

जिओ ट्रू 5G पॉवर्ड वायफाय लाँच करताना, आकाश अंबानीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, जिओचे हाय-स्पीड 5G नेटवर्क लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू होईल. चेन्नईमध्ये कालच 5G नेटवर्क सुरू झाले आहे.

जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफर कालावधीत ही नवीन वाय-फाय सेवा मोफत मिळेल. इतर नेटवर्क वापरणारे देखील जिओ 5G वायफायचा मर्यादित वापर करू शकतील. म्हणजेच, जर त्यांना जिओ 5G पॉवर्ड Wi-Fi ची संपूर्ण सेवा वापरायची असेल, तर त्यांना जिओचे ग्राहक बनावे लागेल. विशेष म्हणजे जिओ ट्रू 5G Wi-Fi शी कनेक्ट होण्यासाठी ग्राहकाकडे 5G हँडसेट असणे आवश्यक नाही. तो 4G हँडसेटवरूनही या सेवेशी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजेच वाय-फायच्या माध्यमातून 4G स्मार्टफोनमध्येही 5G सेवेचा लाभ घेता येतो.

नुकतीच दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. आता त्याचा विस्तार करत, कंपनीने नाथद्वारा आणि चेन्नईमध्ये आणले आहे. कंपनी लवकरच इतर शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

जिओ ट्रू 5G वायफायचे फायदे

जिओ वापरकर्त्यांना ‘वेलकम-ऑफर’ कालावधीत मोफत वाय-फाय सेवा मिळेल. 5G स्मार्टफोनशिवायही Wi-Fi शी कनेक्ट करून, 4G स्मार्टफोनवरही 5G इंटरनेटचा लाभ घेता येतो.

जिओ ट्रू 5G Wi-Fi शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब यांसारख्या ठिकाणी जलद इंटरनेट प्रवेश सक्षम करेल.