दिवाळी हा दहशतवाद संपवण्याचा उत्सव-पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पंतप्रधानांनी सशस्त्र दलांसोबत कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी

  • “अनेक वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात”
  • “आपण ज्या भारताचा आदरपूर्वक उल्लेख देतो तो केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून तर एक जागृत आत्मा, एक अखंड चेतना, आणि एक चिरंतन अस्तित्व आहे”
  • “देशांतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई करत असताना तुम्ही सीमेवर देखील संरक्षक ढाल बनून उभे आहात”
  • “400 पेक्षा जास्त संरक्षण उपकरणे यापुढे परदेशातून विकत घेतली जाणार नाहीत आणि आता ती भारतातच बनवली जातील”असा निश्चय करणाऱ्या आमच्या सशस्त्र दलांची मी प्रशंसा करतो: पंतप्रधान
  • “नवीन आव्हाने, नवीन पद्धती आणि राष्ट्रीय संरक्षणाच्या बदलत्या नव्या आवश्यकतांनुसार आम्ही देशाच्या लष्कराला सामर्थ्यशाली बनवत आहोत”

कारगिल ,२४ऑक्टोबर /प्रतिनिधी :-सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याण्याची परंपरा कायम ठेवत, पंतप्रधानांनी ही दिवाळीसुध्दा कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी केली.

शूर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कारगिलच्या भूमीवरची श्रद्धा नेहमीच त्यांना सशस्त्र दलातील शूर पुत्रांचे आणि कन्यांचे स्मरण देत आकर्षित करून घेते.

“गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात, असे पंतप्रधान म्हणाले. जवानांच्या उपस्थितीत दिवाळीचा गोडी वाढते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या दिवाळीच्या तेजाचा प्रकाश आमच्या आत्म्याला उत्साहीत करतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“एकीकडे राष्ट्राच्या सार्वभौम सीमा आहेत तर दुसरीकडे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध  असलेले सैनिक, एकीकडे मातृभूमीवरचे प्रेम आहे तर दुसरीकडे निधड्या छातीचे शूर वीर जवान.  एवढा प्रचंड आनंद देणाऱ्या दिवाळीची अपेक्षा मी इतरत्र कुठेही करू शकणार नाही.” शौर्य आणि धाडस या आपल्या परंपरा आणि संस्कृती असून त्यांच्या गाथा संपूर्ण भारत आनंदाने साजऱ्या करतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.  “आज, कारगिलच्या या पराक्रमी भूमीवरून, मी भारतातील आणि जगातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले,

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या प्रत्येक युद्धात, भारताने विजय मिळवत, कारगिलमध्ये तिरंगा झेंडा फडकवला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आजच्या भू-राजकीय परिदृश्यात दिव्यांच्या या  उत्सवाने शांतता आणि समृद्धीचा मार्ग प्रकाशित करावा अशी इच्छा आजच्या जगातील भारताच्या उत्कट भूमिकेवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी व्यक्त केली. दिवाळीचे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, “हा दहशतवाद संपवण्याचा सण आहे.” कारगिलच्या युध्दाशी दिवाळीचे साधर्म्य साधत पंतप्रधानांनी अभिमानास्पद टिप्पणी केली,की कारगिलमध्ये नेमके हेच साध्य केले गेले होते आणि हा विजयाचा उत्सव आजही सर्वांच्या लक्षात आहे.

आपणही कारगील युद्धाचे एक साक्षीदार होतो आणि ते युद्ध जवळून पाहिले आहे, याची  आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितली. युद्धकाळात जेव्हा भारतीय जवान शत्रूसैनिकांना चोख उत्तर देत होते, तेव्हा पंतप्रधान तेथे  त्यांच्या समवेत काही काळ घालवण्यासाठी आले होते.  तेव्हाची म्हणजे 23 वर्षांपूर्वीची मोदी यांची छायाचित्रे जपून ठेवून ती दाखवल्याबद्दल मोदी यांनी जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य नागरिक म्हणून असलेल्या माझ्या कर्तव्यपथाने मला युद्धक्षेत्रावर आणले होते,  असे पंतप्रधान म्हणाले. देशवासियांनी सैनिकांसाठी जमा केलेले विविध प्रकारचे साहित्य युद्धभूमीवर पोहचवण्यासाठी आपण येथे आलो होतो आणि माझ्यासाठी तो पूजेचा क्षण होता, अशी आठवण यावेळी पंतप्रधानांनी सांगितली. त्यावेळच्या वातावरणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यावेळी देशातला प्रत्येक नागरिक, त्याच्या तन-मन आणि आत्म्यातून देश सुरक्षित राहण्यासाठी, युद्ध जिंकण्यासाठी साद घालत होता. त्यानंतर युद्धाच्या विजयाचा आनंद देशाच्या हवेत मिसळून गेला होता.

ज्या भारताचा आम्ही आदर करतो, पूजा करतो,  तो केवळ एक भौगौलिक भाग नाही तर ती एक जिवंत चैतन्य, एक शाश्वत चेतना आणि चिरंतनअस्तित्व आहे, असे वर्णन पंतप्रधानांनी केळे. जेव्हा आम्ही भारताविषयी चर्चा करतो, तेव्हा भारताच्या संस्कृतीचे अविनाशी चित्र समोर येते, परंपरेचे वर्तुळ स्वतःच  तयार होते आणि भारताच्या सामर्थ्याचे मॉडेल विकसित होण्यास सुरूवात होते, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी पुढे असे सांगितले की, भारत हा अशा अस्त्र आणि शस्त्रांचा प्रवाह आहे की ज्याची सुरूवात एका टोकाला आकाशभेदी हिमालयाने होते तर दुसरीकडे भारतीय महासागरांना तो कवेत घेतो. इतिहासात अनेक भरभराटीला आलेल्या संस्कृती वाळूच्या कण होऊन नष्ट होऊन गेल्या, पण भारतीय संस्कृतीचा प्रवाह तसाच  अबाधित राहिला, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.  जेव्हा एखाद्या भूमीचे  शूर पुत्र आणि कन्या आपले सामर्थ्य आणि संसाधनशक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवून कार्य करतात, तेव्हाच, एखादे राष्ट्र अमरत्व पावते असे पंतप्रधान म्हणाले.

कारगीलची युद्धभूमी ही भारतीय सैन्याच्या साहसाचा झगमगता प्रज्वलित पुरावा आहे. द्रास, बटालिक आणि टायगर हिल ही क्षेत्रे म्हणजे भारतीय सशस्त्र दलाचे धैर्य आणि शौर्यापुढे पर्वतांवर ठाणे देऊन बसलेला शत्रु किती खुजा ठरला,  याचा पुरावा आहे, असे उद्गार मोदींनी काढले. भारतीय सीमांवर पहारे देणारे सैनिक म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे संवेदनक्षम स्तंभ आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, एखादा देश तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा त्याच्या सीमा सुरक्षित असतात, त्याची अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने ठासून भरलेला असतो. देशाच्या ताकदीबाबत आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा संपूर्ण देशाचे नीतीधैर्य ओसंडून वाहू लागते, असेही पंतप्रधान म्हणाले. देशवासियांमध्ये असलेल्या दृढ ऐक्याच्या भावनेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान आणि वीज तसेच पाण्याची सुविधा असलेल्या पक्क्या घरांचे जवानांच्या कुटुंबांना योग्य वेळेत केलेले वितरण ही उदाहरणे दिली. प्रत्येक जवानाला त्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. जेव्हा अगदी दूरवर असलेल्या जवानांच्या घरांमध्ये या सेवा पोहचतात, तेव्हा त्यांना आगळे समाधान लाभते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

जेव्हा उत्तम कनेक्टिव्हिटी असते तेव्हा लष्करातील जवानाला त्याच्या घरी फोन करणे सहज शक्य असते. एवढेच नाही तर सुट्टीच्या काळात त्याला सहज घरीही जाता येते, असे त्यांनी पुढे नमूद केले. सात आठ वर्षांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात दहाव्या स्थानावर असलेला भारत आता पाचव्या स्थानावरची मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकास पावत आहे हे त्यांनी अधोरेखित केले. संशोधनाचे चक्र चालू ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या ऐशी हजारहून अधिक स्टार्टप्सचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. दोन दिवसांपूर्वी इस्रोने ब्रॉडबँडच्या विस्तारासाठी एकाच वेळी 36 उपग्रह अवकाशात सोडून नवीन विक्रम केल्याचेही त्यांनी सांगितले, पंतप्रधानांनी युक्रेन युद्धाचा उल्लेख करत तिथे भारतीयांसाठी तिरंगा हा संरक्षक कवच ठरल्याचा उल्लेख केला. भारताने अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही शत्रूंशी यशस्वीपणे दोन हात केल्याचा हा परिणाम आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

“तुम्ही सीमेवर चिलखत बनून उभे आहात त्याचवेळी देशाच्या अंतर्गत शत्रूंवरही कडक कारवाई केली जात आहे. देशाने दहशतवाद, नक्षलवाद आणि कट्टरतावाद उखडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.” ते त्यांनी सांगितले. एकेकाळी देशाच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या नक्षलवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की नक्षलवाद्यांनी बऱ्याच मोठ्या भूभागाला विळखा घातला होता, मात्र त्यांचा प्रभाव आता सातत्याने कमी होताना दिसत आहे असे ते म्हणाले.

भ्रष्टाचारावर बोलताना भारत याविरुद्ध निर्णायक लढाई लढत आहे असे विधान पंतप्रधानांनी केले. भ्रष्टाचारी कितीही प्रभावी असो तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही असे सांगून त्यांनी म्हटले वाईट दर्जाच्या व्यवस्थापनामुळे देशाच्या क्षमतांना मर्यादा येतात. मग त्यासाठी विकासाच्या कामात अडथळे निर्माण केले जातात. ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका आशीर्वाद’ या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. या सर्व जुन्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. आधुनिक युद्धशास्त्रात अंतर्भूत असणारी तंत्रज्ञानाची प्रगती यावरही त्यांनी प्रकाश टाकल. पंतप्रधान म्हणाले की भविष्यातले युद्धांचे स्वरूप बदलणार आहे आणि या नवीन युगात, आपण नवीन आव्हाने , नवीन पद्धती आणि देशाच्या संरक्षण विषयक बदलत्या गरजांच्या अनुषंगाने देशाची लष्करी ताकद वाढवली आहे.

लष्करात गेल्या कित्येक दशकांपासून आवश्यक असणाऱ्या प्रमुख बदलांविषयी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या लष्कराला कोणत्याही आव्हानांना त्वरित तोंड देण्यासाठी लष्करी दलांमध्ये उत्तम समन्वय निर्माण होणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत असा विश्वास पंतप्रधानांनी दिला.

यासाठी सीडीएस सारख्या संस्थांची स्थापना केली आहे तसेच आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे सीमेवर निर्माण केले जात आहे ज्यामुळे जवानांना अधिक आरामशीरपणे आपले कर्तव्य बजावता येऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

देशात अनेक सैनिकी शाळा उघडल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.भारतीय लष्करात आधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्रे आहेत ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले.

संरक्षण दलातील तिन्ही विभागांनी परकीय शस्त्रे आणि यंत्रणांवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आत्मनिर्भर होण्याचे वचन दिले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “मी आमच्या तिन्ही सैन्य दलांचे कौतुक करतो, ज्यांनी ठरवले आहे की 400 पेक्षा जास्त संरक्षण उपकरणे यापुढे परदेशातून विकत घेतली जाणार नाहीत आणि आता ती भारतातच बनवली जातील”, असेही ते म्हणाले. स्वदेशी शस्त्रे वापरण्याचे फायदे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा भारताचे जवान देशात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी लढतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वेगळ्याच उंचीवर असतो आणि त्यांचे हल्ले शत्रूचे मनोबल चिरडताना शत्रूपक्षाला आश्चर्यकारक धक्के देऊन जातील. पंतप्रधानांनी यावेळी प्रचंड या – हलक्या लढावू हेलिकप्टर (लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर), तेजस फायटर जेट्स आणि अवाढव्य अशा विमानवाहू युद्धनौका विक्रांत यांची उदाहरणे दिली आणि  त्याचबरोबर अरिहंत, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, पिनाक आणि अर्जुन यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, आज भारत आपली क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा मजबूत करत असताना संरक्षण उपकरणांचा निर्यातदार देखील बनला आहे, तसेच ड्रोनसारख्या आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञानावरही वेगाने काम करत आहे.

“आम्ही अशा परंपरेचे पाईक आहोत, जिथे युध्दाला शेवटचा पर्याय मानला जातो”, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारत नेहमीच जागतिक शांततेसाठी सकारात्मक आहे. “आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत, पण सामर्थ्याशिवाय शांतता शक्य नाही” असा इशाराही  मोदी यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, आमच्या सैन्यात क्षमता आणि रणनीती आहे आणि जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आमच्या सैन्याला देखील त्यांच्या भाषेत शत्रूला चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहित आहे. गुलामगिरीची मानसिकता नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर बोलताना पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन केलेल्या कर्तव्यपथाचे उदाहरण दिले आणि ते म्हणाले की, यामुळे नव्या भारताच्या नव्या विश्वासाला चालना मिळणार आहे “राष्ट्रीय युद्ध स्मारक असो किंवा राष्ट्रीय पोलीस स्मारक असो, ते नवीन भारताची नवीन ओळख निर्माण करतात” असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचेही स्मरण केले आणि ते म्हणाले की, “आता नौदलाच्या ध्वजात शिवरायांच्या शौर्याची प्रेरणा जोडली गेली आहे.”

आज संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आणि त्याच्या विकासाच्या क्षमतेकडे लागल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा भारताच्या या सामर्थ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरणार आहे. “यात तुमची भूमिका खूप मोठी आहे कारण तुम्ही भारताची शान आहात,” असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले. भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना समर्पित कविता वाचून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.