संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी घेतला सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि युद्धसज्जतेचा आढावा

कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली

नवी दिल्ली,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-संरक्षण दलप्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी व्हाईट नाइट कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यांच्यासमवेत, आज 24 ऑक्टोबर 2022 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी भागातील सीमेवरील चौकीला (सैन्य तळाला) भेट दिली आणि कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. सीडीएस चौहान यांनी नौशेरा सेक्टरमधील युद्धस्मारक नमन स्थळावर पुष्पहार अर्पण केला आणि देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.

जनरल अनिल चौहान यांना फील्ड कमांडर्सनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) युद्ध सज्जता आणि सुरक्षाविषयक परिस्थितीबद्दल  सविस्तर माहिती दिली.  या प्रदेशात आव्हानात्मक भूभाग आणि प्रतिकूल हवामान परिस्थिती असतानाही चौहान यांनी संरक्षण पायाभूत सुविधांचा विकास आणि  युद्ध सज्जतेबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.

सीडीएस  चौहान यांनी सैनिकांना संबोधित केले, त्यांना व्यावसायिकता जोपासण्याचे आणि भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाची समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले. सर्वोत्तम युद्धसज्जतेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

दिवाळीच्या मुहूर्तावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी दिलेली ही भेट आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी  तैनात असलेल्या जवानांचे मनोबल वाढवणारी ठरली.