मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील असतील भाजप व शिक्षक परिषदेचे संयुक्त उमेदवार

औरंगाबाद,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील असतील व त्यांना शिक्षक परिषद समर्थन देईल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. किरण पाटील व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

किरण पाटील यांनी गेल्या 14 ऑक्टोबर रोजीच हजारो शिक्षकांसह काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाच मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते.आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एकेकाळी काँग्रेस नेते असलेल्या व काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बावनकुळे म्हणाले की, मराठवाडा शिक्षक मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. यंदा अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या प्राध्यापक किरण काळे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजप आणि शिक्षक परिषदेचे ते संयुक्त उमेदवार असतील. किरण पाटील हे मुळचे बीडचे रहिवासी आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला चांगले समर्थन मिळेल व ते नक्की विजय मिळवतील.

किरण पाटलांवरच विजयाची जबाबदारी

किरण पाटील यांच्यासोबतच मराठवाड्यातील विविध शिक्षक संघटनांचे सदस्य आणि पदाधिकारी भाजपात सामील झाले आहेत. भाजपने किरण पाटील यांना मराठवाड्यात शिक्षक नोंदणी अभियानाचे प्रमुख केले आहे. याबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, किरण पाटील यांच्या रुपात प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता भाजपला मिळाला आहे. त्यांना आम्ही संपूर्ण रणांगण दिले आहे. यात ते नक्की यशस्वी होतील.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची घट्ट पकड आहे. सध्या आमदार विक्रम काळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हा गड जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मराठवाड्यात भाजपचे सर्व युनिट्स कार्यरत करण्यात आले आहे. मराठवाड्यातील शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे नसलेला या मतदारसंघात यंदा 100 टक्के भाजप विजय मिळवेल.