केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ठाकरे गटावर चौफेर हल्ला:महाराष्ट्राच्या राजकारणाचा नाही, तुमचा स्तर घसरला!

पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर पलटवार करत आता राणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचा स्तर घसरलेला नाही, जे बोलत आहेत त्यांच्याच राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचे राजकारण चांगले आहे. राजकारणाचा स्तर घसरला, असे मला वाटत नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना खडसावले.

नारायण राणे यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विविध नेत्यांना लक्ष्य केले. तसेच आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे या आपल्या दोन मुलांच्या भाषेवरून होत असलेल्या टीकेवरही भाष्य केले. ‘तुम्हाला भास्कर जाधव यांची भाषा आवडते, पण फक्त माझी मुलेच दिसतात का? माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिले तर ते दिसते, पण बाकीचे लोक काय बोलतात हे मीडियाला दिसत नाही का? माझ्या मुलांविषयी बोलायला मी इथे आलो नाही,’ असे नारायण राणे यांनी म्हटले.

शिवसेनेतील फुटीनंतर ५५ पैकी तब्बल ४० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केले, तर १५ आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. मात्र या १५ पैकी बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाण्यास उत्सुक असून चार आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.