नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे – पालकमंत्री नवाब मलिक

परभणी,दि.15: मागील काही कालावधीपासून कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातले असून, नागरिकांनी या संकटाचा समर्थपणे लढा देत, आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.

Displaying 15.8 (4).jpg

            भारतीय स्वातंत्र दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि महापालिका आयुक्त  देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

            पुढे बोलतांना पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले की, यावर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती समाधारकारक असून जिल्ह्यात 480.6 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 4 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. तसेच या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 78 हजार 882 शेतकऱ्यांना 436 कोटी 48 लाख रुपये पिक कर्जाचे वितरीत करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकरी बांधवांना 983 कोटी 16 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम अदा करण्यात आली आहे. गत ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकरी बांधवांना रुपये 297.00 कोटी रक्कम संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 3.75 लाख हेक्टरवर पिक विमा संरक्षण कवच घेतले आहे.  जिल्ह्यात दहा वर्षानंतर प्रथमच विक्रमी कापुस खरेदी करण्यात झाली असून 34 हजार 22 शेतकऱ्यांचा 10 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याने शेतकरी बांधव समाधानी झाले असल्याचे ही श्री. मलिक यावेळी म्हणाले.

Displaying 15.8 (3).jpg

            जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे येत आहे. शिवभोजन योजनेतंर्गत जिल्ह्यात 11 शिवभोजन केंद्राद्वारे मागील चार महिन्यात एकुण 1 लाख 80 हजाराहून अधिक शिवभोजन थाळीचे गरजू व्यक्तींना वितरण करण्यात आले आहे. तसेच जिह्यातील 2 लाख 9 हजार 992 लाभार्थ्यांना सोशल डिस्टसिंगचे नियमांचे पालन करुन  अन्न-धान्याचे वितरण करण्यात आले आहे.

            सद्यस्थितीत सर्व देशांत कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात. कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून याकरीता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. याकरीता खाजगी डॉक्टरांची देखील सहकार्य घेतले जात आहे.  तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या व्यक्तींची जिल्हा परिषदेच्या आरोग्‌य विभागकडून व्हीआरआरटी (Village Rapid Response Team) पथकामार्फत तपासणी करण्यात येत असल्याचे ही यावेळी म्हणाले.

Displaying 15.8 (5).jpg

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1193 रुग्ण झाले असून, त्यापैकी 486 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 653 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 54 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ॲन्टीजेन किट उपलब्धतेनुसार नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षासह कोरोना केअर सेंटर, आयसोलेशन वार्डमधील रुग्णांची तपासणी करुन त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवीत आहेत. तसेच मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने अशा व्यक्तींची माहिती संकलीत करुन त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेनुसार ठिकठिकाणी गर्दी होऊ नये जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. 

            कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अविरत कार्यरत आहेत. संभाव्य रुग्णवाढ विचारात घेऊन त्याप्रमाणे जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत. परंतू सर्व नागरिकांना सतर्क राहणे, मुखपट्टीचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी साबणाने हात धुणे आणि सार्वजनिक जागी स्वच्छता या नियमाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी  पालकमंत्री श्री. मलिक यांनी यावेळी केले. 

            यावेळी गंगाखेड तालूक्यातील सुपा ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना कोवीड-19 चा संसर्ग होऊ नये याकरीता उपाययोजना करण्यासाठी कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रामदास अनंतराव आम्ले यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याअनुषंगाने रामदास अनंतराव आम्ले यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा विमा कवच मदतीची रक्कम त्यांच्या वारसांना पालकमंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आली. तसेच यावेळी जिल्ह्यात कोविड-19 बाबत महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

            या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *