खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करून शिऊर बंगला येथील हॉटेलमध्ये खून ; दोघांना जन्मठेप

वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- खंडणीसाठी शिर्डी येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून  त्याचा शिऊर बंगला (ता. वैजापूर) येथील एका बंद धाब्याच्या हॉटेलमध्ये खून केल्याप्रकरणी वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच अपहरणाच्या आरोपाखाली दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी व शस्त्र कायद्याप्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरी  अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या दोन्ही शिक्षा एकत्र भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दुर्गाप्रसाद ओम प्रकाश मिश्रा (२६,रा. सुंदरपूर जि. वाराणसी, ह.मु. शिर्डी, ता. राहता) व  समशेर सरदार पठाण (३५, रा. शिर्डी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे असुन या प्रकरणातील  इक्बाल मुसा शेख(२५), रसुल आयुब शेख (२५), भागिनाथ विश्वनाथ शिंदे (३५) सर्व रा.शिर्डी या तीन आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात शिर्डी येथील व्यापारी शशिकांत उर्फ बब्बु प्रभुनारायण पाण्डेय (३५, वाराणसी, ह.मु. शिर्डी) यांचे १६ जुलै २०१६ रोजी नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथुन २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. खटल्यानुसार आरोपींनी व्यापारी पाण्डेय यांचे संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास इंडिका कार (क्रमांक एमएच२८ सी १९९१) मधुन अपहरण करुन त्यांना औरंगाबाद वैजापूर रस्त्यावरील शिऊर बंगला येथील बंद असलेल्या ढाबा हॉटेलमध्ये ओलीस ठेऊन नंतर देशी कट्ट्याचा वापर करुन खुन केला.  याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात खुन, अपहरण व शस्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला. उपविभागिय पोलिस अधिकारी हर्ष पोतदार व पोलिस उपनिरीक्षक डी.आर. फराटे यांनी तपास केला. या गुन्ह्यचे दोषारोपपत्र वैजापूर न्यायालयात सादर केल्यानंतर
जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली व साक्षीपुरावा नोंदवण्यात आला. सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे बावीस साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपी दुर्गाप्रसाद मिश्रा व  समशेर पठाण यांना दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी  दोन्ही आरोपींना जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल. त्यामुळे तसेच अन्य आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली असून या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. त्यांना शिऊर पोलिस स्टेशनचे पैरवी अधिकारी बदने यांनी सहकार्य केले.