शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लघुउद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मराठवाडा लघु उद्योग संघटनेच्या सभागृहाचे उद्घाटन

औरंगाबाद,२१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात लघु उद्योगवाढीसाठी अमृत या उपक्रमांतर्गत उद्योजकांसाठी 2 हजार चौ.फूट भूखंड व यात 1 हजार चौ.फुटावर बांधकाम उद्योग विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे लघुउद्योजकांना पाठबळ व स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे यावेळी सांगितले. हा पथदर्शी (पायलट) प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्य भर उद्योग विभागामार्फत असे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

            चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मराठवाडा लघुउद्योग (मसिआ) सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोहोयो तथा पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रदीप जैस्वाल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उद्योजक मानसिंग पवार, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

            औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी समृद्धी महामार्गास शेंद्रा एमआयडीसी जोडण्यासाठी 900 मीटरचा जोड रस्ता निर्माणासाठी निधी, तसेच औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते विकासाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व तो निधी त्याच औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाईल. अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

             पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून आवश्यक त्या बाबीसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन जाईल. त्याचप्रमाणे उद्योजकांच्या अडीअडीचणी समजून घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाय योजना करण्याची ग्वाही यावेळी उपस्थित उद्योजकांना दिली.

            सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, मसिआ ने मराठवाड्यात लघुउद्योजकांना वेळोवेळी सहकार्य, मदत आणि पाठबळ दिले आहे. यामुळे पाच ते साडे पाच हजार लघु उद्योजकांनी 3 लाख कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत महानगरपालिका हद्दीत येत असल्याने रस्ता, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात असल्याचे सांगितले. तसेच शेंद्रा परिसरात “कन्हेवेशन सेंटर ” तयार करण्याची मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे केली. उद्योगासाठी सबसिडी, औरंगाबाद विमानतळा वरून अधिकच्या विमान फेऱ्या वाढवण्याबाबतची मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे केली.

            मसिआचे अध्यक्ष किरण जगताप  म्हणाले की मानसिंग पवार यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेले सभागृह मराठवाड्यातील उद्योजकांसाठी व्यासपीठ, प्रशिक्षण व सहकार्याचे ठिकाण बनेल. अशी माहिती प्रस्ताविकात देऊन मसिआच्या विविध उपक्रमाविषयी दिली.