स्वातंत्र्यदिनानिमित्त कोविड योद्ध्यांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान

मुंबई, दि. १५ : वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी उत्कृष्ट महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोविड योद्ध्यांच्या आभारासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. डॉक्टर, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार अशा विविध योद्ध्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच मुंबईमध्ये आपण कोविडवर नियंत्रण प्राप्त करू शकलो. हा लढा कोविडपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे. मला खात्री आहे की ही लढाई सुद्धा आपण नक्कीच जिंकू. पण ही लढाई अजून संपलेली नसून लोकांनी यापुढील काळातही कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोरोनामुक्तीसाठी कार्य करणारे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिमा खांडावाला, डॉ. ज्योती दराडे, डॉ. हरिता सावे, ट्रामा केअर हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या माने, सेव्हन हिल्स हॉस्पीटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार, सहायक महापालिका आयुक्त किशोर गांधी, संतोष दोंडे, अजित अंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने, पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक झुबेदा मोहम्मद रजा शेख, पोलीस कर्मचारी विवेकानंद साळुंखे, नंदकुमार वारंग, तुषार चौधरी, सचिन राठोड तसेच दिवंगत सहायक महापालिका आयुक्त अशोक खैरनार यांच्या पत्नी रत्ना खैरनार यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महसूल दिनानिमित्त निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला. अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार संदीप थोरात, नायब तहसीलदार सुरेश महाला यांच्यासह महसूल कर्मचारी रोहन पाटोळे, सुजाता काळे, कांचन पाटील, योगेश मानकर, महादेव पाष्टे, सुभाष सोंडकर यांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास आमदार झिशान सिद्दीकी, आमदार दिलीप लांडे, जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *