‘सप्त रंगात न्हावून आली, आली माझ्या घरी ही दिवाळी..’ 

ललित कला संकुलाच्या स्वरदिपावलीत रंगले विद्यापीठ 

नांदेड ,२१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- आली माझ्या घरी ही दिवाळी.., बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल.., तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला.., छाप तीलक लई छिनी.., ज्योति सावित्री फुले घराण्याला नमन.., अशा एकापेक्षा एक बढिया गीतांचा नजराणा, सोबतीला लावणी नृत्याचा ठेका आणि पखवाज, संवादिनी, ढोलकी व लोकसंगीत वाद्यांची जुगलबंदी यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ न्हाऊन निघाले. बाहेर कोसळणारा पाऊस आणि सभागृहातील शब्दसुरांची बरसात यात अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी रंगून निघाले. निमित्त होते ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने आयोजित केलेला ‘स्वरदीपावली’ हा संगीत सोहळा. 

दिवाळी सणाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये स्वरदिपावली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, नवोपक्रम नवसंशोधन साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, फिल्म  ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे संजय मोरे, विद्यार्थी विकास  संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, ललित कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकांक्षा मोतेवार यांनी ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. युवक महोत्सवात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या निवेदिता घोडेकर यांनी ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला. कृष्णा शिनगारे यांनी एकल संवादिनी वादन सादर केले, मुंजाजी शिंदे यांनी शास्त्रीय तालवाद्य अंतर्गत पखवाज आणि समाधान राऊत यांनी एकल ढोलकी वादन केले. राजश्री पुद्दलवाड यांच्या शास्त्रीय गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तर श्रद्धा कांबळे यांनी सादर केलेल्या ‘ज्वानीचा मसाला कुटते’ या लावणीला रसिकांनी डोक्यावर घेतले. लावणीला रसिकांनी ‘वन्समोर’ ची मागणी केली. ‘छाप तीलक लयी छिनी, मोसे नैना लगाए’ ही कव्वाली निवेदिता घोडेकर आकांक्षा मोतेवार, सुरेखा इटकरे, आशुतोष पाटील, गजानन गोंधळी आणि संचाने सादर केली. प्रशांत चित्ते यांनी सादर केलेला सत्यशोधक जलसा स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवून गेला. संकुलातील प्रा. शिवराज शिंदे यांनी या जलस्याची निर्मिती केली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विविध तालवाद्यांची जुगलबंदी फोकआर्केस्ट्रा या प्रकारांतर्गत सादर करण्यात आली. यामध्ये समाधान राऊत, अंकुश डाखोरे, गजानन गोंधळी, ओमकार गायकवाड, गणेश महाजन, आशुतोष पाटील, प्रशांत चित्ते, लक्ष्मण सेनेवाड, मुंजाजी शिंदे यांनी वादनातील आपले कौशल्य दाखवले. विद्यापीठातील कर्मचारी जनार्दन गोवंदे यांची कन्या श्रृती गोवंदे हिने सादर केलेल्या ‘मै दिवानी हो गई’ या लावणीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

याच कार्यक्रमांमध्ये एका प्रेमाची गोष्ट, भोंगा, पाटील, रांडा, धग आदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय व पार्श्वगायनाचा ठसा उमटवणाऱ्या संकुलातील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिलीप डोंबे, कपिल कांबळे, शुभम कांबळे यांनी हा सत्कार स्वीकारला.  

युवक महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मार्गदर्शक डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. वैशाली शेळके, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. कैलास पुपुलवाड, डॉ. अनुराधा पत्की जोशी, प्रा. राहुल गायकवाड यांचा तसेच रमेश गायकवाड आणि अतुल येवतीकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर प्रा. किरण सावंत यांनी सूत्रसंचालन व डॉ. शिवराज शिंदे यांनी आभार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, उपकुलसचिव पी. ए. कुलकर्णी, डॉ. रमेश ढगे, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. कैलास यादव, डॉ. विश्वाधार देशमुख, प्रा. संदीप काळे, डॉ. विनायक येवले, डॉ. दिपाली देशमुख, उद्धव हंबर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यापीठाचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.