पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळावा:10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा येत्या 22 ऑक्टोबरला होणार शुभारंभ

टीसीएस, आयबीपीएसमार्फत रिक्त पदांच्या परीक्षा घेणार; राज्यातही  ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर

पहिल्या टप्प्यात 75000 नव्या नेमणुका केल्या जाणार

नवी दिल्ली ,२० ऑक्टोबर/प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेळावा- ह्या 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या समारंभात, 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येतील. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील. 

पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरु झाले आहे.

देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या 38 मंत्रालये/विभागांमध्ये कामावर रुजु होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी( अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे.

मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे. 

७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.

या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील.