काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे विजयी

24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनंतर नवा अध्यक्ष मिळाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. खरगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर शशी थरूर यांना केवळ १ हजार ७२ मते मिळवता आली. ४१६ मते नाकारण्यात आली. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला. यापूर्वी गांधी घराण्याव्यतिरिक्त सीताराम येचुरी अध्यक्ष होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हा नेतृत्वबदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होती. शशी थरूर यांनी ट्विट करून मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस अध्यक्षपद मिळणे ही सन्मानाची आणि जबाबदारीची बाब असल्याचे त्यांनी लिहिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना या कार्यात पूर्ण यश मिळो. तसेच, या निवडणुकीत 1000 हून अधिक नेत्यांचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते की आता माझी भूमिकाही खरगेजी ठरवतील.पत्रकार परिषदेत राहुल यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेतल्याबद्दल काँग्रेसचा अभिमान व्यक्त केला आहे.