विदेशी पर्यटकाना सराला बेटाची भुरळ…

सराला बेटाला इटलीच्या पर्यटकांची भेट ; गंगागिरी महाराज यांच्या समाधीचे घेतले दर्शन

वैजापूर,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याला एकरूप करणारे स्थान म्हणजे गंगागिरी महाराजांचे सराला बेट होय. या बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेला लेने को हरिनाम- देणे को अन्नदान अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची महाराष्ट्रात मोठी चर्चा होते. इ.स. 1847 पासून हा सप्ताह निरंतर सुरू असल्याने या सप्ताहाची गिनिज बुक मंध्ये सुद्धा नोंद आहे.त्यामुळेच इटलीहुन आलेल्या तब्बल 25 पर्यटकानी मंगळवारी (ता.18)  सराला बेटला भेट देवून माहिती जाणून घेतली.

दरम्यान,या बेटावर विदेशी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली.बेटाच्या विविध ठिकाणी ग्रुप फोटो काढायचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. यावेळी विदेशी पर्यटकांनी श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी यांच्या समाधीचे दर्शन व महंत रामगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले यावेळी सरला बेटांचे विस्वत मधुकर महाराज,गोविंद महाराज मलीक यांनी गोदावरीच्या मधोमध असलेल्या  दहा एकर परिसरात औषधीयुक्त वनस्पती, फळबागा, गोशाळा तसेच पर्यावणपूरक झाडांची माहिती विदेशी पर्यटकाना दिली.

सप्ताहाच्या आकर्षणामुळे  दिली भेट

सराला बेट आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गंगागिरी महाराज यांनी त्यांच्या मातोश्रींची समाधी असलेल्या अन्नपूर्णा माता समाधी मंदिर कापूसवाडगाव येथून हरिनाम सप्ताहाची सुरवात केली होती. कापूसवाडगाव येथून सुरू झालेल्या सप्ताहाने नंतर गर्दीचे उच्चांक मोडीत काढले. गवळी शिवरा येथे 2017 मध्ये झालेल्या सप्ताहाला जवळपास दहा लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्म्या मंत्रिमंडळाने सप्ताहाच्या सांगतेनिमित्त हजेरी लावली होती. गिनीज बुकमध्ये या सप्ताहाची त्यावेळी नोंद करण्यात आली होती.याच आकर्षणामुळे  इटलीच्या पर्यटकानी मंगळवारी बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असलेल्या बेटाला भेट देवून सप्ताहाची माहिती जाणून घेतली.