अतिवृष्टीने नुकसानग्रस्त खरीपातील पिकांची नुकसान भरपाई द्या -भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  यांचकडे निवेदनाव्दारे रविवारी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने सध्या शेतामधील उभी असलेली पिके सोयाबीन, कापूस, तुर, मुग, बाजरी, उडीद धान, फळ भाज्या, पाले भाज्या,मिरची, फळ पिके व इतर उभ्या असलेल्या  पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी पिकाला करे फुटले आहेत.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. पिककर्ज काढून पिकांची लागवड केली, त्याची अंतर मशागत केली, खत घातला, किटक नाशकाची फवारणी केली आणि नेमके उत्पन्न हातात येण्याच्या वेळी पावसाने सतत झोड उठवली.घेतलेल्या कर्जाची फेड व आलेला दिवाळीचा सण कसा साजरा करायचा या मुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. म्हणून झालेल्या नुकसानीची पाहणी करुन तात्काळ विनाविलंब दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना सरसगट पिकांची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  यांच्याकडे केली आहे.