साईबाबा यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : प्राध्यापक साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने केलेली निर्दोष सुटका सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे प्राध्यापक साईबाबा यांना मोठा झटका बसला आहे.

देशाविरोधात युद्ध पुकारने, माओवाद्यांशी संबंध, माओवादी कारवायात सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली साईबाबा यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी आणि एका पत्रकारासह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी त्यांची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज, शनिवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीवेळी समाजाच्या हितासाठी आम्ही खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या ७ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या साईबाबा यांची सुटका होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.