दीपावलीत आकाशातही दीपोत्सव:२५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार

मराठवाड्यातील सर्व शहरामधून पाहण्याची संधी

औरंगाबाद,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-दिवाळीत मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. दीपावली निमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई सोबतच आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला  मिळणार असल्याचे माहिती एमजीएम  एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना औंधकर म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवार २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार असून ते भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून पहायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण ग्रहणचक्र ( सॅरोस ) १२४ क्रमांकाचे आहे.

मराठवाड्यातील शहरांच्या वेळा  पाहिल्यास औरंगाबाद येथुन सायंकाळी ४-५० वाजता सूर्यग्रहणास स्पर्श होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५-४२ वाजता होईल त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकील . पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायं. ६-०९ वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. मात्र खगोल व हौशी छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.
शहर. स्पर्श वेळ. मध्य. सुर्यास्त
औरंगाबाद .४:५०…५:४२….५:५९
जालना…. ४:४९…..५:४२…..५:५६
बीड…..४:५२ ….५:४३…..५:५७
उस्मानाबाद ४:५४..५:४४….५:५७
परभणी…..४:५२…..५:४३…..५:५३
नांदेड…….४:५३…..५:४३…..५:५१
लातुर…..४:५४…..५:४४…..५:५४
हिंगोली…४:५१…..५:४२…..५:५१

ग्रहण ग्रसण्याची टक्केवारी ही सर्वात कमी उस्मानाबाद येथे ३३ टक्के तर सर्वात जास्त जालना येथे ३७ टक्के असणार आहे…

सूर्यग्रहण हे साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण हे ग्रहण चष्म्यातूनच पहावे किंवा चाळणीतून सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन त्यामध्ये पहावे. 

या सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी मंगळवार  २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण नाही. यामुळेच सूर्यग्रहण पाहण्याची नामी संधी मिळणार आहे. कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर हा दीपावलीचा सण पृथ्वीवर आणि आकाशात मोठ्या उत्साहात  साजरा होणार आहे.

आगामी दहा वर्षांपर्यंत सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार नाही

आगामी दहा वर्षांत भारतातून दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत यातील ०२ ऑगस्ट २०२७ रोजी दिसणार्‍या खंडग्रास सूर्यग्रहणा दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे हे ग्रहण दिसण्याची शक्यता कमीच आहे तर २१ मे २०३१ रोजी रामेश्वरम मधुन कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून आपल्या मराठवाड्यात ते खंडग्रास स्थितीत पहायला मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी खंडग्रास सुर्यग्रहण पाहण्याची मिळालेली संधी चुकवु नये. असे आवाहन ही श्रीनिवास औंधकर यांनी केलेले आहे.

‘ग्रहण चष्मे’ एमजीएम विज्ञान केंद्रात उपलब्ध

सूर्यग्रहण पाहण्यासाठी आवश्यक विशेष ग्रहण चष्मे औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत. यासाठी एमजीएम विज्ञान केंद्र फोन क्रमांक ९८५००८०५७७ वर संपर्क करावा..

औरंगाबाद येथे विशेष ग्रहण महोत्सव
या खंडग्रास सूर्यग्रहणा निमीत्त नागरिकांमधील असेलेल्या गैरसमजुती/अंधश्रद्धा दुर करुन त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी “टेलिस्कोप ओनर्स मीट” चे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्यांचे कडे स्वतःची दुर्बिण आहे यांनी सहभागी व्हायचे असुन या मीट दरम्यान आलेल्या नागरिकांमधील प्रश्नाची उकल करण्यात मदत करावी लागणार आहे. या मीट मध्ये सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे २० ऑक्टोबर पर्यंत एमजीएम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राकडे नोंदवावीत.

श्रीनिवास औंधकर
संचालक
महात्मा गांधी मिशन
एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब,
एन ६ -सिडको,
औरंगाबाद- ४३१००३
9850080577