अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर इतर पक्षांचे नऊ उमेदवार

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, दि. १७ ऑक्टोबर २०२२

मुंबई उपनगर, १५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र विधानसभेच्या  अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक  होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

आणि

१४. श्री.शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष).

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

याचबरोबर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

भारत निवडणूक आयोगाने १६६ – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२-८८६-७१७ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५३६ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील.

पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८३५५-८७३-९२६ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५७३ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जनतेला भेटतील.

त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून श्री.सत्यजित मंडल  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५९१-३८३-९१५ हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-३१४००५६१ आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत जनतेला भेटतील, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली आहे.

येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंधेरी पूर्व या विधानसभा मतदार संघात मतदान होत असून या भागातील सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि लोकशाही सुदृढ करावी, असे आवाहनही श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे