औरंगाबादकरांनी पाहिला ‘शिवप्रताप गरूडझेप’

आ.सतीश चव्हाण यांच्या वतीने मोफत ‘शो’चे आयोजन

औरंगाबाद- खासदार तथा प्रसिध्द अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरूडझेप हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. औरंगाबाद शहरातील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, क्रीडा आदी क्षेत्रातील नागरिकांसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शहरातील आयनॉक्स सिनेमा येथे नुकताच या चित्रपटाचा मोफत ‘शो’ आयोजित केला होता.

आ.सतीश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या शिवप्रताप गरूडझेप चित्रपटाचा शहरवासीयांनी आनंद घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बुध्दीचातुर्याच्या जोरावर आग्रा येथून केलेली स्वत:ची सुटका ही ऐतिहासिक घटना या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सर्वसामान्य आणि तरूण पिढीपर्यंत पोहचावा तसेच तरूणांनी यातून प्रेरणा घ्यावी हा चित्रपट दाखवण्यामागचा मुख्य उद्देश होता असे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांची देखील यावेळी विशेष उपस्थिती होती. अनेक वर्षांनंतर एक अप्रतिम चिपत्रट पाहण्यास मिळाला. हा चित्रपट म्हणजे इतिहासाची खरी ओळख पटवून देणारा असल्याच्या प्रतिक्रिया चित्रपट झाल्यावर उपस्थित नागरिकांनी दिल्या. तसेच अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली भूमिका त्याच बरोबर चित्रपटातील संपूर्ण सहकलाकारांनी केलेल्या अप्रतिम अभिनयाचे देखील सर्वांनी विशेष कौतुक केले.