वैजापूर- गंगापूर रस्त्यावर कारची धडक ; शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

वैजापूर,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-सायकल वरुन जाणाऱ्या शाळकरी मुलाला भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. वैजापूर गंगापूर रस्त्यावर वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजाठाण फाट्याजवळ हा अपघात घडला. अनंत अशोक जगताप (वय 14, राहणार- शिरसगाव) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी कार चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. अभिजीत नरहरी दहिवाळ (राहणार औरंगाबाद) असे कार चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत जगताप हा महालगाव येथील न्यू हायस्कूल शाळेचा विद्यार्थी असून तो सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सायकलवरून शाळेत जात होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या डस्टर कारने (एमएच ११ सीजी ९८९९) त्यास जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासुन त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी मयत अनंत याचा चुलत भाऊ अल्पेश जगताप यांनी तक्रार दिल्यानंतर हेड कॉन्स्टेबल विजय बामंदे यांनी कार चालकाविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गुणवंत थोरात करीत आहेत.