अपघाती मृत्यू : एक कोटी चौदा लाखाची नुकसान भरपाई मंजूर

औरंगाबाद,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मोटार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सूर्यभान कान्हु गोरे यांचे वारसांना मुलगा शुभम, मुलगी शिवानी तसेच आईवडिल शकुंतलाबाई व कान्हु पुंजाजी गोरे यांना एक कोटी १४ लाख ७१ हजार ७९६ रुपये ९ टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधिश तथा मोटार अपघात प्राधिकरणाचे अध्यक्षा वर्षा पारगावकर यांनी दिले आहेत.
गणोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कायमस्वरुपी शिक्षक असलेले सूर्यभान गोरे आपल्या पत्नी व अन्य सहकाऱ्यांसह २३ ऑगस्ट २०१९ रोजी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चिखली खामगाव रोडवर कारमधून प्रवास करीत होते. अंत्रज फाट्याजवळ त्यांच्या कारसमोर जनावर आल्याने  अचानक ब्रेक मारल्यामुळे एमएच २२ यु ३२४६ ही पलटी झाली. या अपघातात कारमधील प्रवासी सूर्यभान कान्हू गोरे, चालक राजेंद्र भीकनदास वैष्णव, हरि बारकु सोनवणे व सूर्यभानची पत्नी उषा सूर्यभान गोरे हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चौघेही उपचार सुरु असताना मरण पावले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सूर्यभान व उषाबाई यांच्या वारसांनी अ‍ॅड्. सुनिल क हिवाळे गाजगावकर यांच्यामार्फत  मोटार अपघात न्यायाधिरणात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला.
अ‍ॅड्. हिवाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ४७ वर्षीय मयत सूर्यभान कान्हु गोरे हे कष्टाळु व तब्येतीने सुदृड होते. ते त्याच्या कुटुंबातील एकमेव कर्ते होते. ते ज्या कारमधून प्रवास करीत होते कारचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे कार पलटी झालेली आहे. कारचालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झालेला आहे. सर्व कुटूंब त्यांच्याच उत्पन्नवर अवलंबून होते व त्यांच्या अवेळी अपघाती मृत्युमुळे कुटुंबाचे सर्व उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे वारसांना नुकसान भरपाई मिळायला हवी.सुनावणीअंती न्यायालयाने मृताचे वय, भविष्यातील बुडालेले उत्पन्न आदी बाबी बघून मयताचे वारसांना अपघातास कारणीभुत वाहनाचे चालक व मालक व द न्यु इंडीया इन्शोरन्स कंपनी यांनी नुकसान भरपाईची रक्कम वैयक्तीक वा संयुक्तीकरित्या अदा करावी असे आदेश दिले. सदर दावा दाखल झाल्यापासून पूर्ण रक्कम मिळेपर्यंत या रक्कमेवर ९ टक्के व्याज द्यावे असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच अन्य एका स्वतंत्र नुकसान भरपाईच्या दाव्यात न्यायालयाने उषाबाई यांच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून वेगळे ११ लाख ५६ हजार ८२४ रुपये मंजूर केले आहेत. या प्रकरणी अ‍ॅड्. हिवाळे यांना अ‍ॅड्. शितल एस शर्मा यांनी सहकार्य केले.