मनसे स्वबळावरच ; उद्धव ठाकरे-शिंदेंच्या वादाला जनता कंटाळली-मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

मुंबई,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची सर्वत्र चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये वारंवार होणाऱ्या बैठका या युतीचे संकेत समजले जात होते. मात्र मनसेच्या आज झालेल्या बैठकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

मनसेच्या आजच्या बैठकीत युती आणि आगामी निवडणुकीवर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असली तरी त्याचा फायदा होणार नसल्याचे मत राज ठाकरे यांनी मांडले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे. ते योग्य नाही. लोक गोंधळलेले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. ‘आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, कामाला लागा’, अशा सूचनाही राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.