वैजापूरच्या जीवनगंगा वसाहतीत बगीच्या मध्ये गोंधळ ; जाब विचारल्याच्या कारणावरून पोलिसांसह तिघांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-बगीच्यामध्ये गोंधळ घालणार्‍या युवकांना जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांना दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना  रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील जीवनगंगा वसाहतीत घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासही मारहाण करण्यात आली असून ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या जीवनगंगा वसाहतीतील  दीपक बोर्डे हे रविवारी रात्री फिरण्यासाठी बाहेर पडले असताना त्यांना वसाहतीसमोरील बगिच्यामध्ये काही  युवक गोंधळ घालत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन त्या युवकांना या सोसायटीत कुटुंबे राहत असल्याने या ठिकाणी गोंधळ करू नका. असे समजावले. त्याचा राग आल्याने पंकज राजपूत याने त्याच्या हातातील दगडाने दीपक बोर्डे यांच्या कपाळावर मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचारी रावसाहेब रावते यांनादेखील पंकज याने दगडाने मारहाण केल्याने त्यांना डोळ्याच्या खाली मोठी दुखापत झाली. पंकज राजपूत व त्याच्या सोबत असलेल्या अन्य पाच जणांनी या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार दीपक बोर्डे यांनी पोलिसात दिली. त्यावरून पंकज राजपूत, शक्ती राजपूत, राणा राजपूत, जयदेव राजपूत. संजु राजपूत व अमोल पंडित (सर्व राहणार वैजापूर) यांच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.