संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच

मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारागृहात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. संजय राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत ईडीने त्यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. 1039 कोटींच्या या घोटाळ्यात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे.

नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल ; संजय राऊत यांचा विश्वास

आतापर्यंत अनेक पक्षांची चिन्हे गोठविण्यात आली आहेत. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. भविष्यात आम्ही आणखीन सक्षम होऊ, असा विश्वास अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तर गोठविण्यात आले आहेच; पण त्याचसोबत शिवसेना हे नाव देखील वापरण्याची अनुमती निवडणूक आयोगाने नाकारली आहे. शिंदे गटाला देखील आता त्यासाठी नवीन चिन्ह आणि नाव आयोगाला द्यावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जामिनाच्या न्यायालयीन सुनावणीसाठी आले असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या आधीही अनेक पक्षांची चिन्हे गोठविण्यात आली आहेत. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.