हिवाळ्यात येणार कोरोनाची नवी लाट

नवी दिल्ली ,९ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल ६२ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. वर्ल्डोमीटने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत ६५,६०,७४४ लोकांचा बळी गेला आहे. तर ६२, ६५,००,८६२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील ६०,६०, ८०,७२७ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. जसजसा हिवाळा जवळ येत आहे, तसतसे नवीन कोविड लाटेचा धोका देखील वाढत आहे. ओमायक्रॉन सबवेरियंट्स बीए ४ आणि बीए ५ ज्यांनी गेल्या उन्हाळ्यात कहर केला होता.

चिंतेची बाब म्हणजे आता ओमाय़क्रॉनचे नवीन सबवेरिएंट्स आता पुन्हा समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सांगितले की शास्त्रज्ञ ओमायक्रॉनच्या शेकडो नवीन प्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, बुधवारी उशीरा जाहीर झालेल्या डब्ल्यूएचओच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की चाचणीत मोठी घट असूनही, युरोपमधील प्रकरणे गेल्या आठवड्यात १५ लाखांपर्यंत पोहोचली, एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी हे जास्त असल्याचे समोर आले आहे.

जागतिक स्तरावर प्रकरणांची संख्या कमी होत आहे. अलिकडच्या आठवड्यात, यूके तसेच २७ देशांमधील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ४ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात, गिम्बे या स्वतंत्र सायंटिफिक फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, इटलीमध्ये कोविड-१९ च्या लक्षणांसह रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे.

आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात यूकेमध्ये कोविडमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची चिंता वाढत आहे. ओमायक्रॉनवरील प्रभावी लस सप्टेंबरमध्ये युरोपमध्ये लाँच करण्यात आली. तर बीए १ आणि बीए ४/५ वर प्रभावी होते. यूकेमध्ये, फक्त बीए १ प्रभावी लसींना मान्यता देण्यात आली होती. युरोपियन आणि ब्रिटीश अधिकारी केवळ वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांसाठी नवीन बूस्टर शॉट्सचे समर्थन करत आहेत.

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी याच दरम्यान गेल्या आठवड्यात इशारा दिला होता की, फ्लूचा प्रसार आणि कोव्हिड १९ चे पुनरागमन यामुळे आधीच तोंड देत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेवर आणखी दबाव येऊ शकतो. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.