राष्ट्रचेतना-2022:युवक महोत्सवातील पोवाड्यातून सामाजिक व ऐतिहासिक चेतना

नांदेड ,९ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- राष्ट्रचेतना-2022 या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लोकशाहीर वामनदादा कर्डक या मुख्य मंचावर स्पर्धकांनी पोवाडा या कलाप्रकारातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि महापुरुषांची गौरवगाथा व्यक्त करणारे पोवाडे सादर करीत प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले.

महात्मा बसवेश्वर लातूरच्या विद्यार्थ्यांनी गाथा बळीराजाची हा पोवाडा सादर करीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न समोर आणला. नम्रता वाघमारे, स्वाती स्वामी, उर्मिला काळे, ज्ञानेश्वरी माळी, मानसी मन शेट्टी, अनघा मुळे यांनी हा पोवाडा सादर केला .तर एमजीएम महाविद्यालय नांदेडच्या कलावंतांनी स्त्रीभ्रूण हत्या या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर पोवाडा सादर केला. त्यामध्ये मधुरा महाजन, वैष्णवी घुगे, सेजल बंडेवार, राधिका पायरे, अक्षदा उगले, रोहिणी यांनी हुबेहूब वेशभूषेत हा पोवाडा सादर केला.

महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या विश्वनंदा नरवंशी, वैष्णवी स्वामी, संघर्ष गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून रोमांच उभे केल. पोवाडा या कलाप्रकारात कलावंतांनी राष्ट्र चेतना जागवणारे पोवाडे सादर करत आणि ऐतिहासिक घटना सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मूक अभिनयातून महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुलविला देशभक्तीचा मळा..!

 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ग्रामीण पाॅलिटेक्निक टेक्निकल कॉलेज नांदेड येथे सुरू असलेल्या विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवात मूक अभिनय सादर करीत आपल्या दमदार अभिनयाने भक्तीचा मळा फुलविला.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, या वर्षीचा युवक महोत्सव ग्रामीण पाॅलिटेक्निक महाविद्यालयात सुरू आहे. या महोत्सवाचा पहिला दिवस महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाजविला. 

जयवंत दळवी नाट्य मंचावर महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूक अभिनय सादर केला. यामध्ये राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाचे उत्तम उदाहरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये महात्मा गांधी यांचा अहिंसावादी विचार, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव  यांचे बलिदान, स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली प्रगती तसेच पाकिस्तानवर मिळविलेल्या कारगिल विजयाचे भव्यदिव्य सादरीकरण करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या अग्निबाणाचे ऐतिहासिक उड्डाणही दाखविण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नाट्यकृती मध्ये अमोल बनसोडे, राहूल कांबळे, राम पाटील, ज्ञानेश्वर श्रीरामे, भागवत भोसले, प्रशांत काळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना संघ प्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ.सतीश ससाणे, सौ. सीमा गीते, डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.