शिवसेनेला खूप मोठा झटका :धनुष्यबाण चिन्ह गोठवले 

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ‘धनुष्यबाण’ नाही!

नवी दिल्ली ,८ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. निवडणूक आयोगाने आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेतला आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत.शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती. 

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत देखील शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर दोन्ही गटासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही गटाकडून खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केला जात होता. शिंदे गटाने तर 40 आमदार, 12 खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिंदे गटाने त्याबाबतचे कायदेशीर पुरावे देखील निवडणूक आयोगाकडे देखील सादर केले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील काही कागदपत्रे जमा करण्यात आले होते. दोन्ही बाजूने आपापली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून आणखी वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळत आज दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश :

1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

२) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.

4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि

यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो

आयोगाने मंजूर केलेले आणि;

(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

ठाकरे गटाची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. निशाणी कोणतीही असली तरी अंधेरीची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच लढेल आणि जिंकेल असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

शिंदे गटाची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा तात्पूरता आहे की कायमचा आहे याबाबत तपासलं पाहिजे, काहीही असलं तरी आमचा दावा चिन्हावर आहेच असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. पण निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो मान्य करुन पुढे जावं लागेल, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. 

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी कोणतं चिन्ह वापरायचं असा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे. त्यामुळेच अंधेरी पोटनिवडणुकीसाठी वाघाचा चेहरा किंवा वाघ अशी निशाणी मिळवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. कारण शिवसेनेच्या बॅनरवर धनुष्य बाणासह नेहमीच वाघही झळकत आलाय. शिवसेनेचा वाघ जनतेला परिचित आहे. त्यामुळेच ठाकरेंनी वाघ चिन्हासाठी निवडणूक आयोगाला विचारणा केल्याचं समजतंय.