आदिवासी महिलेवरील बलात्कार व खून प्रकरणात योग्य व जबाबदार अधिकाऱ्याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश-औरंगाबाद खंडपीठ 

औरंगाबाद, ८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नंदूरबार जिल्ह्यात घडलेल्या आदिवासी महिलेवरील बलात्कार व खून प्रकरणात योग्य व जबाबदार अधिकाऱ्याचे शपथपत्र दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी दिले आहेत. धडगाव पोलिस ठाण्याअंतर्गत घडलेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते.

धडगाव पोलिस ठाण्याच्या कार्यकक्षेतील एका गावात आदिवासी महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. बलात्कार आणि हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी केला होता. आपल्या मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन केले जाईल व गुन्ह्याचा योग्य रितीने तपास होईल या आशेवर कुटुंबियांनी पीडित महिलेचे प्रेत ४३ दिवस मिठाच्या खड्ड्यात पुरून जतन केले होते. या घटनेच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर पीडितेच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करुन खुनाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नि:पक्षपातीपणे व योग्य तपास होऊन पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून ॲड. सुदर्शन जीवनराव साळुंके यांनी उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा व तपासी यंत्रणेने गुन्ह्याचा तपास करुन तपासाचा प्रगती अहवाल प्रत्येक आठवड्याला उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश व्हावेत यासाठी याचिका दाखल आहे. तपासात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय व फौजदारी कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने सरकारी अभियोक्त्यांना संबंधित व जबाबदार अधिकाऱ्याचे शपथपत्र १० ऑक्टोबरपूर्वी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य सरकारतर्फे ॲड. एम. एम. नेरलीकर व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे ॲड. ए. जी. तल्हार काम पाहत आहेत.