कोकणात मुसळधार! विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच कोकणात सकाळपासून मुसळधार सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. तरीही आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

यावर्षी काही ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्ते घरे, जनावरे यांचेही मोठे नुकसान झाले. २३ लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.