अंबानी धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

मुंबई ,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणा-या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मनीगाछी येथून राकेश कुमार मिश्रा या तरुणाला अटक केली आहे.

दरभंगाचे एसएसपी अवकाश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अटक केलेला राकेश कुमार हा मानसिकरित्या आजारी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस त्याला सोबत घेऊन गेली असून पुढील कारवाई मुंबई पोलिसांकडून होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

५ तारखेला रिलायन्स फाऊंडेशनच्या लँडलाईनवर दोनदा अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यात हॉस्पीटल आणि अँटिलिया दोन्ही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. अंबानी कुटुंबीयांच्या काही सदस्यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणाची गंभीरता पाहून मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पथक तयार करून आरोपीच्या अटकेसाठी ते रवाना करण्यात आले. आरोपीला घेऊन टीम मुंबईत येत आहे आणि त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. याचा तपास केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५७ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी. बी. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबीयांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. या धमकीच्या फोननंतर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची आला होता. तसेच मुंबई पोलिसांनी तपासही सुरू केला होता.