शेतीचा वादावरुन तरुणाच्‍या डोक्यात कुऱ्हाडीने वार:आरोपीला एक महिना सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद, ६ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शेतीचा वादावरुन तरुणाच्‍या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन जखमी केल्याप्रकरणी आरोपी अमित मानखॉं तडवी (२२ रा. सातगाव(डों), ता. पाचोरा) याला एक महिना सक्तमजुरी आणि पाच हजाररुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी ठोठावली.

प्रकरणात सुजित शमाकांत ढापरे (२५, रा. नांदगाव ता. सोयगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादीच्‍या कुटूबांची गट नंबर २१७ मध्‍ये शेतजमीन आहे. तर त्यांच्‍या शेतीच्‍या पश्चिमेला गट नंबर २११ मध्‍ये मानखॉं गुलाबखॉं तडवी याची शेती आहे. तडवी कुटूंब हे शेतातच वस्‍ती करुन राहतात. ते सर्व फिर्यादी व त्‍यांच्‍या कुटूंबियांना शेतातून ये-जा करतात म्हणुन नेहमी शिवीगाळ करित होते. फिर्यादीच्‍या शेतात ते बैल सोडून मालाचे नुकसान करीत होते. तसेच तडवीच्‍या कुटूंबाने फिर्यादीच्‍या चार-पाच एकर शेत जमीनीवर अवैध कब्जा देखील केला होता. फिर्यादी व त्‍यांच्‍या कुटूंबीयांनी त्‍यांना समजावून सांगितले मात्र ते नेहीम शिवीगाळ करुन धमक्या देत होते.

१२ जुलै २००९ रोजी फिर्यादी हे कुटूंब व मजुरांसह शेतात काम करीत होते. दुपारी साडेबारा वाजेच्‍या सुमारास तेथे मानखॉं तडवी, त्‍याची पत्‍नी बापूबाई तडवी, मुले अमित आणि अशोक तडवी, परवीन अशोक तडवी, युसूफ लालखॉं तडवी, रुस्‍तुम लतीफ तडवी असे लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेवून आले. त्‍यांनी तुम्ही आमच्‍या शेतात का आलात शिवीगाळ लाठ्या-काठ्या आणि दगडाने मारहाण केली. तर आरोपी अमित तडवी याने त्‍याच्‍या हातातील कुऱ्हाड फिर्यादीच्‍या डोक्यात मारुन जखमी केले. या प्रकरणात सोयगाव पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक बी.व्‍ही. वाकोदकर यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अमित तडवी याला भादंवी कलम ३२४ अन्‍वये एक महिन्‍याची सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. तर उर्वरित आरोपींची न्‍यायालयाने निर्दोष मुक्तता केली.आरोपींच्‍या वतीने प्रकाश उंटवाल आणि डी.आर. बारी यांनी काम पाहिले.