लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे

मुंबई ,​५​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यामध्ये दि. ५ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २२१७ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५८१३१ बाधित पशुधनापैकी एकूण २९४१० पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री.सिंह म्हणाले,उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण ११५.११ लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १११.०५ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ७९.३७  % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

राज्यात दि. 05.10.2022 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 395, अहमदनगर जिल्ह्यातील 234, धुळे जिल्हयात 34, अकोला जिल्ह्यात 371, पुणे जिल्ह्यात 136, लातूर मध्ये 25, औरंगाबाद 73, बीड 8, सातारा जिल्ह्यात 172, बुलडाणा जिल्ह्यात 335, अमरावती जिल्ह्यात 289, उस्मानाबाद 8, कोल्हापूर 109, सांगली मध्ये 23,  यवतमाळ 2, परभणी – 1, सोलापूर 26, वाशिम जिल्हयात 34, नाशिक 7, जालना जिल्हयात 15, पालघर 2, ठाणे 28, नांदेड 24, नागपूर जिल्हयात 6, हिंगोली 1, रायगड 5, नंदुरबार 19  व वर्धा 2  असे एकूण 2384 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास,  मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य  लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे सिंह यांनी सांगितले.