सेवा पंधरवड्यात महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

औरंगाबाद,​४​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज या पंधरवाड्यात निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.    

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण या पंधरवड्यात करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

क्षेत्रीय स्तरावर १० सप्टेंबर २०२२ पर्यंत पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या ५८ हजार ४५७ नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवड्यात सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देऊन महावितरणने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ५२८, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २५ हजार ६८५, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ९७५ आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ६७३ नवीन घरगुती वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.  

याशिवाय ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी ४४ हजार ६६९ ग्राहकांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून या सर्व ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार २८५, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २० हजार २८३, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६ हजार ३०० आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ८०१ ग्राहकांचा समावेश आहे.