दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका:शरद पवारांचा ठाकरे आणि शिंदे गटाला सल्ला

पुणे,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिला आहे. दसरा मेळाव्यात एकमेकांवर टीका करताना मर्यादा ओलांडू नका. राज्याच्या दृष्टीने हे चांगले होणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

आज पुण्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत शरद पवार म्हणाले, खरे तर हे दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत आणि खरा पक्ष कोणता यावरुन त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेच्या निकालाची सुत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. असा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षालाही एक मर्यादा ठेवली पाहीजे. मर्यादा ओलांडून काही होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ते चांगल नाही.

शरद पवार म्हणाले, दसरा मेळाव्यात दोन्ही गटांकडून जी काही मांडणी होईल, त्यातून आणखी कटुता वाढू नये. उलट दोन्ही बाजूंनी मर्यादा पाळत मांडणी केल्यास राज्याच्या राजकारणातील कटुता कमी होण्यास मदत होईल. तणावपूर्ण वातावरण दुरुस्त व्हावे, यासाठी पावले टाकली पाहीजे. त्याची जबाबदारी राजकारणातील आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर तर आहेच, मात्र राज्यातील १४ कोटी लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्याच्या प्रमुखांवर ही जबाबदारी अधिक आहे. ते ही जबाबदारी पाळतील, अशी अपेक्षा करुयात.

मेळाव्याला राष्ट्रवादीचे समर्थन नाही

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या समर्थनार्थ मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोस्टर्स लावल्याचे समोर आले आहे. यावर भाजपने टीका करत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही गर्दी जमवण्यात येईल, असा दावा केला आहे. यावर शरद पवार म्हणाले, या सर्व गोष्टीत राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. दसरा मेळावा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. दुसरा मेळावा मुख्यमंत्री शिंदेंचा आहे. त्यात इतर पक्षीयांनी ढवळाढवळ करण्याचे कारण नाही.

पोटनिवडणुकीत मात्र शिवसेनेला सहकार्य

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेनेला सहकार्य करणार, असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीला कोणताही प्रस्ताव नाही

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे की, २०१४ मध्येच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हाच ही आघाडी झाली असती तर आज अशी वेळ आली नसती. यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीला असा प्रस्ताव आला असे कधीही माझ्या कानावर आले नाही. राष्ट्रवादीला कुणीही असा प्रस्ताव दिला असता तर मला नक्कीच कळाले असते.

‘भारत जोडो’ हा काँग्रेसचा कार्यक्रम

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात येत आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, भारत जोडो हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाकरिता ही यात्रा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील यात्रेत त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते, नेते सहभागी होतील, हे योग्य आहे. इतरांनी सहभागी होण्याचे कारण मला दिसत नाही, असे ते म्हणाले.