स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राची मोहोर; राज्याला एकूण २३ पुरस्कार

राज्यातील तीन शहरे आणि एका कटकमंडळाचा राष्ट्रपतींच्या हस्‍ते सन्मान

नवी दिल्ली ,१ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड  शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती  द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगर पलिका आणि देवळाली कटक मंडळाचाही (कॅन्टॉनमेंट बोर्ड) राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज  एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2022’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम 12 पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.

पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

महाराष्ट्रातील तीन शहरांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराने उत्तम कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई शहराला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रपतींच्या हस्ते देवळाली कटक मंडळाचा सन्मान

देशातील एकूण 62 कटक मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नाशिकमधील देवळाली कटक मंडळाला सर्वोत्तम कटक मंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंचालक अजय कुमार शर्मा  आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द देवळीकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कारांसोबतच अहमदनगर कटकमंडळ, बारामती, भोकर, गडचिरोली, गेवराई, कर्जत, कुरखेडा, लोणावळा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पंढरपूर, पन्हाळा, पिंपरी चिंचवड, रहिमतपूर, सासवड, शेलू आणि श्रीरामपूर या शहरांनाही विविध श्रेणींमध्ये  केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्या शहरांचे रहिवासी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे अभिनंदन केले. इंदूर शहराने सलग सहाव्यांदा पहिला क्रमांक पटकावल्याचे त्यांनी नमूद केले. इंदूर शहरातील रहिवाशांनी स्वीकारलेल्या लोकसहभागाचे मॉडेल देशभरातील इतर शहरांनीही स्वीकारावे, असे त्या म्हणाल्या.

तरुणांनी समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करावी-राष्ट्रपती

राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वच्छ सर्वेक्षण, राज्य आणि शहरांमध्ये स्वच्छतेसाठीच्या स्पर्धेला प्रोत्साहन देत आहे.  यंदाच्या सर्वेक्षणात 4000 हून अधिक शहरांमधील सुमारे नऊ कोटी लोकांनी भाग घेतला असल्याचेही  त्यांनी नमूद केले.  नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत व्यापक स्तरावर जनजागृती केल्याबद्दल राष्ट्रपतींनी गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे कौतुक केले.

 ‘स्वच्छ भारत अभियानाच्या ‘ यशामागे केंद्र आणि राज्य सरकारे तसेच सर्व नागरिकांचे गेल्या आठ वर्षातील सातत्यपूर्ण  प्रयत्न असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.   हे यश मिळवण्यात आमच्या सफाई मित्रांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्या म्हणाल्या. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी स्वच्छता राखण्यासाठी सतत काम केले.

वर्ष 2026 पर्यंत सर्व शहरे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी, 1 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत अभियान -शहर  2.0’ ची सुरुवात करण्यात आली, असे राष्ट्रपतींनी सांगितले. योग्य कचरा व्यवस्थापनासाठी, ओला आणि सुका कचरा घरोघरी विलग करण्याबाबत सर्व नागरिकांना जागरूक करण्यासाठी शहरांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून ही मोहीम राबवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपले रस्ते, गाव, परिसर आणि शहरे स्वच्छ ठेवणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. सर्वांनी विशेषतः तरुणांनी या मोहिमेत सहभागी होऊन समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी  केले.