ऑरिकमध्ये 7 हजार 20 कोटींची गुंतवणूक; 8 हजार जणांना मिळणार रोजगार

कॉस्मोफिल्म व पिरामल फॉर्मा प्रा. लि. असे या दोन कंपन्यांची १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक

औरंगाबाद,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील शेंद्रा व बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आतापर्यंत सात  हजार २० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून ८ हजार ७३ प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडचे   व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली. 

दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांना ३११ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉस्मोफिल्म व पिरामल फॉर्मा प्रा. लि. असे या दोन कंपन्यांची नावे असून या दोन्ही कंपन्या सुरू झाल्यानंतर २ हजार ७०० जणांची प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. बिडकीन येथील औद्योगिक पट्ट्यात पहिल्यांदाच ३२०० रुपये चौरस मीटर दरात २५ टक्के सवलत देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडचे   व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली.

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीमध्ये (ऑरिक) शेंद्रा येथील ३३३ भूखंड उद्योगांना देण्यात आले असून येथून उत्पादनही सुरू झाले आहे. मात्र, बिडकीन येथील क्षेत्रात अद्याप गुंतवणूक झाली नव्हती. दोन कंपन्यांनी आता गुंतवणूक केली आहे. कॉस्मोफिल्मसाठी १७३ एकर जमीन देण्यात आली असून ही कंपनी १०२० कोटी रुपयांची तर पिरामल फार्मा या कंपनीस १३८ एकर जागेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कॉस्मोफिल्मचा प्रकल्प २०२४ पर्यंत सुरू होईल तर पिरामलचे उत्पादन २०२३ मध्ये सुरू होईल.

बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी दळणवळणाच्या सोयी अधिक असल्याने येत्या काळात शेंद्रा- बिडकीन हे प्रकल्प विकासाला मोठी गती देणाऱ्या ठरतील असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. येत्या काळात पंतप्रधान गतीशक्ती प्रकल्पातून कामगिरीनिहाय प्रोत्साहन अनुदान योजनाही लागू होईल असे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद- पुणे हा रस्त्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याने तसेच ड्रायपोर्ट सुरू होणार असल्याने बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असे सांगण्यात येत आहे.

दिल्ली-मुंबई औद्योगिक वसाहतीअंतर्गत (डीएमअायसी) औरंगाबादजवळ पहिल्या टप्प्यातील १० हजार एकरवर भव्य दिव्य उद्योगनगरी उभी करण्याचे काम अाता अंतिम टप्प्यात आले अाहे. शेंद्रा एमअायडीसीतील २५०० एकर जागेवर यापूर्वीच पाणी, रस्ते, वीज व इतर सुविधांची सर्व कामे पूर्ण झाली अाहेत. पाच वर्षांपूर्वी ऑरिक सिटीचे प्रत्यक्षात काम सुरू झाले. हा प्रकल्प २५ हजार एकरवर असून त्यापैकी १० हजार एकर जमीन शेंद्रा आणि बिडकीनमध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेसहा हजार कोटींचा खर्च पायाभूत सुविधांसाठी करण्यात आला. या प्रकल्पाचे काम एआयएलटी ही कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून पाहत अाहे. शेंद्रा परिसरात आतापर्यंत छोट्या-मोठ्या ६० कंपन्या सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जमिनीचे अधिग्रहण सुरू झाले असून आतापर्यंत १७०० एकर जमीन अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती एआयएलटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी या हेतूने ऑरिकच्या माध्यमातून पुढाकार घेत १०० उद्योजकांची ३० सप्टेंबर रोजी बैठक झाली. सदर बैठकीला उद्योजकांनी प्रतिसाद दिला. ८ हजार रोजगारासह ७ हजार २० कोटींची गुंतवणूक ऑरिक येथे होत आहे. १२ नामांकित कंपन्यांनी त्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवातही केली असून ५० पेक्षा अधिक कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. येणाऱ्या काळात फूड पार्क, टेक्स्टाइल पार्क, आयटी पार्कसोबतच इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटरचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

मराठवाड्यात पिकणाऱ्या पिकांचा विचार करत ऑरिकमध्ये फूड पार्कची निर्मिती करणार असून त्यासाठी बिडकीन येथे १६८ एकरांवर फूड पार्कसाठी जागा प्रस्तावित आहे. त्यासोबतच टेक्स्टाइल व आयटी पार्कसाठी प्रस्ताव तयार केल्याचे काकाणी यांनी सांगितले. ऑरिकमध्ये छोटे, मध्यम व मोठ्या उद्योगांनी प्रक्रिया उद्योग स्थापित केले तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळेल. तसेच रोजगारनिर्मिती होईल असेही त्यांनी सांगितले. १६८ एकरांवर फूड पार्क, बिडकीन येथे १ हजार एकरांवर टेक्स्टाइल पार्क, तर ऑरिक येथे आयटी कंपन्यांसाठी तसेच ९ एकर जागेवर इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटर उभारणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.

एप्रिलपासून ऑरिक स्वतः वीज वितरण करणार आहे. विजेची गरज भागवण्यासाठी सौर पॅनल लावले जातील. रस्त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला पत्र दिले आहे. ऑरिकमध्ये एमआयडीसीकडून २० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातील ४२ टक्के पाण्याचा फेरवापर केला जात आहे. भविष्यात येथे हरित प्रकल्पासाठी काम केले जात आहे. नोव्हेंबरमध्ये आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त उद्योगांना आमंत्रित केले जाणार आहे.