भगरीतून नव्हे तर भगरीच्या पिठातून विषबाधा, विषबाधा झालेल्यांची प्रकृती सुधारली

वैजापूर,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात  प्रत्येकाची घाबरगुंडी उडवून देणाऱ्या भगरीतून विषबाधा प्रकरणात वैशिष्ट्यपूर्ण माहिती हाती आली आहे. प्रत्यक्ष भगरीतून नव्हे तर भगरीचे पीठ तयार करून बराच वेळ ठेवत त्याचे पदार्थ करून खाल्ल्यानेच लोकांना विषबाधेचा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे स्पष्टीकरण अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त अजित मैत्रे यांनी दिले आहे. विविध तालुक्यांतून भगरीचे नमुने गोळा केले असून, त्याचा अहवाल येताच खरे कारण पुढे येईल आणि त्याच वेळी संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील असेही मैत्रे म्हणाले. या अनुषंगाने कारवायांना सुरुवात केल्याचे सांगतानाच त्यांनी वैजापूर, कन्नड येथे केलेल्या कारवायांची माहितीही दिली. 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वैजापूर तालुक्यात भगरीच्या पिठाचे पदार्थ करून खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली होती. एकट्या वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दीडशेच्या घरात गेला होता. सध्या या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे सूत्रांकडून समजते. 

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तातडीने कारवाया सुरु केल्या. अन्न, औषधी प्रशासनाच्या निरीक्षक सुलक्षणा जाधव यांनी तातडीने वैजापूर गाठून भगरीचे नमुने घेतले होते. तर स्थानिक पोलिसांनीही काही दुकानांवर धाडी टाकून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केला होता. मात्र, केवळ किरकोळ दुकानदारांवर नव्हे तर भगरीचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई अपेक्षित असल्याची चर्चा सुरु झाली होती. 
या पार्श्वभूमीवर अन्न औषधी प्रशासनाचे सहआयुक्त अजित मैत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फक्त भगर खाल्ल्याने लोकांना त्रास झालेला नाही. भगरीचे पीठ तयार करून ते बराच वेळ ठेवल्यानंतर त्याचे पदार्थ करून खाल्ल्याने विषबाधेसारखा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे कंपन्या दोषी असल्याचा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. विषबाधेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नेमके कारण शोधण्यासाठी विविध दुकानांवर छापे टाकण्यात आले. सध्या विविध ठिकाणांहून भगरीचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल दहा दिवसांत येईल. त्यानंतर नक्की दोषी कोण हे स्पष्ट होईल आणि त्यानुसार कारवाई  केली जाईल. वैजापूर तालुक्यातून 82 किलो भगर जप्त करण्यात आली. पोलिसही भारतीय दंड विधानानुसार त्यांची कारवाई करीत आहेत. 
नक्की काय झाले? लोकांनी भगर दुकानांतून, रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून खरेदी केल्यानंतर त्याचे पीठ तयार केले. त्यातही हे पीठ बराच काळ ठेवल्यानंतर आवश्यकतेनुसार त्याचे पदार्थ तयार केले. भगरीचे पीठ तयार करून बराच वेळ ठेवल्याने त्यात अफला टॉक्झिन नावाचे टॉक्झिन तयार झाले. याच पिठाचे पदार्थ तयार करून खाल्ल्याने लोकांना मळमळ, उलट्या, जुलाब, थरथरी असे लक्षणे दिसू लागली. थेट भगर कारणीभूत ठरली असे आताच म्हणता येणार नाही. लोकांनी भगर धुवून, भाजून त्याचा पदार्थ केल्यास काही अडचण नाही. पण त्याचे पीठ तयार करून, तेही बराच वेळ ठेवून त्याचे पदार्थ करून खाल्ल्यास असे होऊ शकते, असे सध्या तरी म्हणता येईल असेही मैत्रे म्हणाले. 
एकाच कंपनीची भगर विविध जिल्ह्यात विकली जाते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या तसेच अन्य भगरीचे किमान दहा नमुने घेतले जात आहेत. त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल येताच दोषी असेल त्यांच्यावर अन्न व औषधी सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील असेही मैत्रे यांनी स्पष्ट केले.