शिवना नदीपात्रातून 3 हजार 373 ब्रास वाळूचा अवैध उपसा ; तलाठी व मंडळाधिकाऱ्यांच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केला पंचनाम्यात घोळ

वैजापूर,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातून तब्बल तीन हजार ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक झाल्याचा अहवाल नुकताच जिल्हास्तरिय त्रिसदस्यीय समितीने दिला आहे. याशिवाय वाळू ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी ताबा देतांना  तलाठ्यासह  मंडळाधिका-यांनी पंचनाम्यात केलेल्या मखलाशीचा भांडाफोडही समितीने केला आहे. याप्रकरणी संबंधित तलाठ्यावर शिस्तभंगाची तर मंडळाधिका-यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिका-यांनी संबंधितांना दिले आहेत.

वैजापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातून एक लाख 61 हजार 34 ब्रास अशी एकूण 20 कोटी 93 लाख 44 हजार 251 रुपये किंमतीची वाळू चोरी झाल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आली होती. तक्रारीत शासनाची चोरी गेलेली वाळूची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी. अशीही मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने 04 मार्च 2022 रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने 22 एप्रिल 2022 रोजी जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान तलाठी व मंडळधिका-यांनी वाळू ठेकेदाराला तालुक्यातील झोलेगाव वाळूपट्ट्याचा ताबा देतांना 23 फेब्रुवारी 2021 रोजी  केलेल्या पंचनाम्यात नदीपात्रातील गट क्रमांक 98 च्या पूर्वेस 48/49 च्या पश्चिमेस 600 × 650 ×10 या आकाराचा खडकाळ खड्डा असून वाळू नसल्याचे नमूद केले तर गट क्रमांक 102 च्या पूर्वेस 100 × 40 × 8 हे अंदाजे उत्खनन झाल्याचे  नमूद केले. परंतु चौकशी समितीच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मुळात नदीपात्राच 149 × 150 फूट  मापाचे उत्खनन केल्याचे आढळून आले.  तलाठी व मंडळधिका-यांनी  पंचनाम्यात नमूद केलेल्या आकारमानाचे खड्डे वाळूपट्ट्यात  दिसून आले नाहीत. याशिवाय ताबा देताना केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आलेली आकडेवारी फुटात की मीटरमध्ये याबाबत देखील चौकशी समितीला बोध झाला नाही. दरम्यान नदीपात्रातील गट क्रमांक 102 व 98 मध्ये खड्डे असल्याचे दर्शवून ठेकेदाराचे हित जोपासण्याचा  प्रयत्न करण्यात आले असल्याचा ठपका समितीने अहवालात ठेवला आहे. याशिवाय नदीपात्रात 6 ठिकाणी नवीन खड्डे आढळून आले असून या खड्ड्यांतून 3 हजार 373 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक झाल्याचे या त्रिसदस्यीय समितीने चौकशी अहवालात नमूद केले आहे. दरम्यान तालुक्यातील लाखणी सज्जेचे तलाठी राजेंद्र पवार यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक तर मंडळाधिकारी अशोक तांबूस, दीपक कऱ्हाळे यांची कार्यालयाच्या स्तरावर विभागीय चौकशीचे आदेश निवासी जिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी दिले आहेत. दरम्यान निवासी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या या आदेशामुळे महसूल विभागातील अधिका-यांसह कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
मंडळाधिका-यांची विभागीय चौकशी रखडली
लाखणीचे तलाठी राजेंद्र पवार यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु तत्कालीन मंडळाधिकारी अशोक तांबूस व दीपक कऱ्हाळे यांच्याविरुद्ध अद्यापपर्यँत शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित केलेली नाही. त्यामुळे दोघांविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना पत्र देऊन म.ना.से.(शिस्त व अपील) 1979 चे नियम 10 अन्वये विभागीय चौकशीचे दोषारोपाचे परिशिष्ट आवश्यक त्या कागदपत्रांसह तात्काळ उपविभागीय कार्यालयास सादर करावे. असे 22 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. मात्र एक महिना उलटून देखील याबाबत कुठलेही पाऊल उचलण्यात आले  नाही.