शिंदेच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन

रश्मी यांच्या स्वागतासाठी महिला शिवसैनिकांनी टेभी नाक्यावर मोठी गर्दी

ठाणे ,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-   शिवसेनचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवामध्ये गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत देवीची आरती केली. विशेष म्हणजे याच दिवशी शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडीच्या वतीने महाआरती होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यापूर्वीच रश्मी ठाकरे यांनी महाआरती केल्याने दोन गटातील संघर्ष मात्र टळला आहे. रश्मी यांच्या स्वागतासाठी महिला शिवसैनिकांनी टेभी नाक्यावर मोठी गर्दी केली होती.

Image

टेंभीनाक्यावरील या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नऊ दिवस देवीचा जागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात सुरू आहे. रश्मी ठाकरे यांनी याच नवरात्रोस्तवात जाऊन देवीची आरती केली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर, संजय तरे, खासदार प्रियंका चुतर्वेदी, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, अनिता बिर्जे, नंदिनी विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. आरती करण्यापूवी रश्मी यांनी टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर आनंद आश्रमांत जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.