सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आयर्नमॅन म्हणून पार्थ रणजित मुळे सन्मानित

औरंगाबाद,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गंगामाई इंडस्ट्रीज आणि कन्स्ट्रक्शन्स लि. कार्यकारी संचालक श्री. रणजित पद्माकर मुळे यांचे चिरंजीव पार्थ मुळे यांनी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. 

खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस पाहणारी ही स्पर्धा फार कमी स्पर्धक पूर्ण करू शकतात. मागील सुमारे दोन वर्षांपासून तो  या स्पर्धेची तयारी करत होता, कठोर मेहनतीने हे यश पार्थ मुळे यांनी मिळविले आहे.  २ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे तीनही क्रीडा प्रकार, साधारण १७ ते १८ अंश सेल्सियस तापमानात एकसलग पूर्ण करावे लागणारी ही जगातील कठिणतम स्पर्धांपैकी एक समजली जाते. दर आठवड्याला २०० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावणे आणि ५ किलोमीटर पोहणे हा क्रम श्री. पार्थ यांनी मागील वर्षभर सरावाद्वारे सांभाळला. 

सिडनी येथे आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देण्यासाठी या हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले होते. विजयानंतर श्री. पार्थ मुळे म्हणाला  ,व्यायाम म्हणून धावण्याचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे आहेत. साथीच्या आजारापासून, फिटनेसवर लक्ष केंद्रित करून लोकांनी सक्रिय आणि निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.

त्याला या विजयात प्रशिक्षक, पद्माकर मुळे, लता मुळे, रणजित  मुळे, रोहिणी मुळे, समीर मुळे, स्नेहल  मुळे, तनिष्का, शर्वरी, मल्हार यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.