वैजापूर विषबाधा प्रकरणी अन्न व औषधी विभागाची कारवाई ; पाच ठिकाणी धाडी, 82 किलो भगरचा साठा जप्त

वैजापूर,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व ग्रामीण भागात उपवासाची भगर खाल्याने 118 जणांना विषबाधा झाली असून याप्रकरणी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.27) पाच ठिकाणी धाडी टाकून 82 किलो भगर साठा जप्त केला आहे. 


या संदर्भात तहसीलदारराहुल गायकवाड, गटविकास अधिकारी एच.आर. बोयनर व अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की भगर खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या सोमवारी (ता.26) रात्रीपासून वाढली असून मंगळवारी (ता.27) दुपारपर्यंत विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 118 पर्यंत पोहचली आहे.

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन यांच्याशी तातडीने संपर्क साधला व योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला. तालुक्यात ज्या ठिकाणी घाऊक अथवा किरकोळ भगर विक्री होत आहे अशा ठिकाणी तात्काळ विक्री थांबविण्यात यावी तसेच भगरचे साठे जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे  तपासणीसाठी पाठवून अहवाल तहसीलदार यांचेकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मंगळवारी (ता.27) तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी एच.आर. बोयनर,तालुका आरोग्य अधिकारी इंदोलकर,अन्न व सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव, मंडळ अधिकारी व तलाठी हजर होते. अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव व त्यांच्या पथकाने दिवसभरामध्ये पाच ठिकाणी धाडी टाकून दोन अन्न नमुने घेतले असून 82 किलो भगरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

https://aajdinank.com/news/35609/