ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबर रोजी आयोजित

नवी दिल्ली ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल 2020 चा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केली. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.  

Image

हा निर्णय घोषित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले “दादासाहेब फाळके निवड समितीने आशा पारेख जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या आजीवन योगदानासाठी सन्मानित करण्याचा आणि पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करताना मला सन्मान वाटतो.” 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केला जाणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील,असे  त्यांनी जाहीर केले  . 

आशा पारेख या ख्यातनाम चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती असून कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. एक बाल कलाकार म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केल्यावर त्यांनी दिल देके देखो या चित्रपटातून प्रमुख नायिका म्हणून पदार्पण केले आणि त्यानंतर 95हून अधिक  चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांनी कटी पतंग, तिसरी मंझील, लव्ह इन टोकियो, आया सावन झूम के, आन मिलो सजना, मेरा गाव मेरा देश यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे .

Image

आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1998-2001 या काळात केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे.         

आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय पाच सदस्यांच्या निवड समितीने घेतला आहे अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली .

52 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निवड समितीमध्ये चित्रपट क्षेत्रातील खालील  पाच सदस्यांचा समावेश होता:  

1.   आशा भोसले

2.   हेमा मालिनी

3.   पूनम ढिल्लो

4.   टी. एस. नागभरणा

5.   उदित नारायण