वॉटर ग्रीडमध्ये सोयगावचा समावेश करण्यासंदर्भात तपासणी करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई ,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोयगाव तालुक्यातील जुन्या निजामकालीन बांधाचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याबाबतही पाहणी करण्यात येईल. सोयगाव तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, सोयगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची या भागातील ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. निजामकालीन बांधाला बॅरेजमध्ये रुपांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावही सादर करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल, असेही कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले.