पीएफआयवर बंदी घालणार! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुणे, २५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)कारवाया आणि पुण्यातील त्या आंदोलनातील पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पुण्याचे पोलिस आयुक्तांना दिली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली. दरम्यान पुणे पोलिसांनी संध्याकाळी पुण्यातील ‘ त्या ‘ प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. देशात समाजविघातक कार्यात गुंतलेल्या पीएफआय या संघटेवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
पुण्यात एक कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात कुठेही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा प्रकाराची घोषणा आम्हाला मान्य नाही. मी पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर दाखल केलाच पाहिजे. पीएफआय संघटनेचा तपास सातत्याने गेली काही वर्षे पुरावे जमा करुन करण्यात आला आहे त्यासाठी वेगवेगळया राज्यांनी काम केले आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना, राज्यात पीएफआय संघटनेच्या कारवायांची नोंद घेतली जात होती, तपास केला जात होता.
 
 
केरळसारख्या सरकाराने देखील पीएफआय या संघटेनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली असल्याचे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष या तपासापासून कोणी कितीही प्रयत्न केले तरी, विचलित होणार नाही आणि निश्चितपणे जे देशद्रोही कारवाया करतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात दोन वेगवेगळया प्रकाराचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्याची योग्य तपासणी होईल, मात्र, राज्यात जो काणी पाकिस्तानचे नारे लावेल, त्यांना आम्ही सोडणार नसून, आम्ही हे खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देखील फडणवीस यांनी दिला. आयुक्तां सोबत आमची चर्चा झाली. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगितल्याचे फडणवीस एका संदर्भात बोलताना म्हणाले.
 
 
नाना पटोले बेताल बोलतात
 
 
नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करीत असतात ते ऐकायचे आणि त्यांचा आनंद घ्यायचा, असा टोला हाणून त्यांनी त्यांच्या विनोदावर आम्हाला प्रतिक्रीया का विचारता, असा सवाल फडणवीस यांनी पत्रकारांना केला. पटोले बेताल बोलतात, असा घणाघणात करुन अशा बेताल व्यक्तीला उत्तर देण्याइतका माझ्याकडे वेळ नाही, असे ते म्हणाले.
 
 
अख्खा महाराष्ट्र सांभाळला सहा जिल्ह्याचे काय घेऊन बसलात? अजित पवारांना प्रत्युत्तर
 
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळी पुण्यात सहा जिल्ह्याच्या पालकमंत्री संदर्भात फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, ‘ येत्या काळात कधी त्यांचे राज्य आले, आणि त्यांनाही दोन चार जिल्हे ठेवायचे असल्यास ते कसे मॅनेज करायचे हा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईल. मात्र, जे जिल्हे आहेत तेथे नियोजन मंत्री म्हणून मी कार्य करणार आहे, मी तर अख्खा महाराष्ट्र संभाळला आहेे, सहा जिल्हयाचे काय घेवून बसलात? असा प्रतिटोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
 
 
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पिंडदान होत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात काही लोक, महाराजांच्या समाधीजवळ बसूनच हे सर्व विधी करत असल्याचे दिसत आहे. या घटनेबाबतही प्रश्न विचारले गेले असताना फडणवीस म्हणाले की, याची नक्की संपूर्ण माहिती घेतली जाईल, चुकीचे काम होत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान य व्हायरल व्हिडिओ बाबत पोलिसांकडून पुष्टी करण्यात आलेली नाही.