२०२४ पर्यंत संपूर्ण भारतात ५ जी सेवा मिळणार-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

नवी दिल्ली : नव्या, अत्यंत वेगवान आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय मिळणारी ५ जी इंटरनेट सेवा लवकरच संपूर्ण भारत पादक्रांत करायला तयार झाली आहे. भारताचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदल माहिती दिली आहे. येत्या १ ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी इंटरनेट सेवेचे लोकार्पण होणार आहे. “येणाऱ्या अवघ्या दोनच वर्षांत म्हणजे २०२४ पर्यंत संपूर्ण भारतभर पसरलेली असेल” असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. सर्वच भारतीयांना अत्यंत वेगवान इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. डिजिटल इंडियाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
  
भारत सरकारकडून ऑगस्ट महिन्यातच ५ इंटरनेट सेवेसाठीच्या स्पेक्ट्रम्सचा लिलाव करण्यात आला होता. त्यात देशातील दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या दोन मोठ्या कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन कंपन्यांनी बाजी मारली होती. येत्या दिवाळी पर्यंत या दोन्ही प्रमुख कंपन्यांकडून १७ प्रमुख शहरांमध्ये ५ जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही कंपन्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही कंपन्यांकडून डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक तालुका, गावांपर्यंत ५ जी सेवा पुरवण्यात आपण यशस्वी होऊ असा या दोन्ही कंपन्यांकडून दावा करण्यात आला आहे.
  
भारतात ५ जी सेवेबद्दल प्रचंड उत्सुकता असून लवकरच अत्यंत वेगवान नेटवर्क सेवा मिळवण्याचे भारतीयांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. सध्या भारतात ४ जी आणि ३ जी सेवा कार्यरत आहेत त्याहून कितीतरी पट जलद इंटरनेट सेवा ५ जी मुळे मिळणार आहे. संपूर्ण भारताला जोडण्यासाठी या सेवेचा मोठा फायदा होणार असून फक्त वेगवान सेवा हाच नव्हे तर महसूल वृद्धी हाही एक मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे. असे दावे अश्विनी वैष्णव यांच्याकडून करण्यात आले आहेत.