वैजापूर तालुक्यातील 7 हजार 744 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी पात्र

16 कोटी 11 लाख रुपयांचे मिळणार अनुदान मिळणार

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-  नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. तालुक्यातील 7 हजार 744 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच तब्बल 16 कोटी 11 लाख 72 हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे. याद्या अंतिम होऊन अपलोड केल्या आहेत. व्हेरिफाय झाल्यानंतर वेब पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे. थम्ब झाल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा निर्णय कोरोना व महापूर या कारणांमुळे प्रलंबित होता. नुकतीच अर्थसंकल्पात महाविकास आघाडीने तरतूद केली होती. पण राज्यातील सरकार बदलले. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार का ? अशी उलटसुलट प्रतिक्रिया शेतकरी वर्गात सुरू होती. आताच्या भाजप, शिंदे सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यास मंजुरी दिली. ताबडतोब कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
अशी होणार रक्कम जमा !
सहकार विभागाकडून अंतिम यादी अपलोड करण्यात आली आहे. चुका दुरुस्ती झाल्यानंतर शासनाच्या वेब पोर्टलवर यादी प्रसिद्ध होईल. ही यादी बँका, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत कार्यालय येथे यादी लावण्यात येणार आहे. यादीत नाव असेल तर थम्ब केल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. बँका, विकास सेवा संस्था, महा ई-सेवा केंद्र येथे थम्बची सोय केली जाणार आहे.
जिल्हा बैंकेने अपलोड केली यादी
जिल्हा बैंकेच्या तालुक्यात असलेल्या 15 शाखेत एकूण 7 हजार 744 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या यादीतील संख्या अशी दहेगाव- 518, धौंदलगाव- 308, गारज- 393, खंडाळा- 1478, लाडगाव 506, लासुरगाव- 185, लोणी खुर्द- 666, वैजापुर- 656, महालगाव- 348, माली घोगरगाव- 215, मनुर- 223, पालखेड 437, परसोडा- 549, शिवुर- 837, विरगाव 425, दरम्यान, तालुक्यात सर्वात जास्त लाभार्थ्यांची संख्या खंडाळा शाखेच्या आहे. येथे तब्बल 1478 शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वात कमी 215 शेतकरी माली घोगरगाव शाखेच्या असल्याची माहिती सहायक उपनिबंधक विनय धोटे यांनी दिली.


अंतिम यादी अपलोड झाली आहे. आता पोर्टल व्हेरिफिकेशन करणार आहे. कॉम्प्युटराईज्ड सिस्टीमला दुबार नाव, इन्कमटॅक्स असेल तर व इतर चुका दुरुस्ती झाल्यानंतर यादी पोर्टलवर लवकरच प्रसिद्ध होईल.

– डॉ.दिनेश परदेशी, संचालक जिल्हा मध्यवर्ती बैंक