राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे

राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे

मुंबई, २३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्पी चर्म रोग आटोक्यात येत असून एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

राज्यात दि. 23 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील  एकूण 1 हजार 666 गावांमध्ये फक्त 19 हजार 160 जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 19 हजार 160 बाधित पशुधनापैकी एकूण 6 हजार 791 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.61 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1 हजार 666 गावातील 36.73 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे तसेच गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने राज्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आता सर्व 4 हजार 850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू आहे, अशी माहितीही आयुक्त श्री. सिंह यांनी दिली.