मर्दांची शिवसेना असेल तर आमच्या मतांवर आमदार झालेल्या पोराला राजीनामा द्यायला सांगा : शेलार

मुंबई ,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-तुमचा सुपुत्र आदित्य ठाकरे आमच्या मतांवर वरळीचा आमदार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेना मर्दांची असेल तर अगोदर पेंग्विनसेना प्रमुखाला राजीनामा द्यायला सांगा, असा पलटवार मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंवर केला आहे. मर्द असाल आणि हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानातील सभेत बोलताना भाजपला दिले. त्यांच्या याच आव्हानाला आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले.

“आमच्या जीवावर निवडून यायचं. दुसऱ्यासोबत सरकार बनवायचं आणि ते पडलं की विद्यमान सरकार बरखास्त करुन दाखवा म्हणून आव्हान द्यायचं, ही पाटलीनीची भाषा योग्य नव्हे. आव्हान द्यायचंच असेल तर लुकड्या तुकड्या महाविकास आघाडीबरोबर जाऊन आमच्याविरोधात निवडणूक लढा आणि आमच्याशी दोन हात करा. उगीच पाटलीनीची भाषा करु नका”, अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.